सोलापूर : खाजगी फायनन्सकडून कर्ज मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. ते कर्ज मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायत येथील गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून ती खाजगी इसमामार्फत स्विकारल्याप्रकरणी चिंचोली काठीचे ग्रामसेवक संतोषकुमार नागनाथ वाघ (वय - ३७ वर्षे) याच्यासह तिघांविरूद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथील ग्रामसेवक संतोषकुमार वाघ यांच्याकडे तक्रारदाराने खाजगी फायनान्स कडून गृहबांधणीसाठी कर्ज मंजुरी करिता आवश्यक असलेले ग्रामपंचायत गावठाण प्रमाणपत्राची मागणी केली होती. तेव्हा ग्रामसेवक वाघ यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई कंत्राटी कर्मचारी याला भेटण्यास सांगितले. शिपाई कंत्राटी कर्मचाऱ्याने त्याच्यावतीने १० हजार रुपयांची लाच मागून त्यांच्या तडजोडीअंती ०७ रुपये देण्याचे ठरले होते.
या संदर्भात तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. २० जानेवारी रोजी त्याची पंचासमक्ष पडताळणी झाल्यावर, एसीबीच्या पथकाने सोमवारी सापळा लावला होता. त्यात ०७ हजार रुपयाची लाच खाजगी इसम सुधीर लांडगे (वय - ४८वर्षे, रा. सावळेश्वर, ता. मोहोळ) याने स्विकारून चिंचोली काठी ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई कंत्राटी कर्मचारी परशुराम रविंद्र पाटोळे (वय - ३५ वर्षे, रा. चिंचोलीकाठी ता. मोहोळ) याच्याकडे लाचेची ती रक्कम दिली.
याप्रकरणी खाजगी इसम सुधीर लांडगे, ग्रामपंचायतचा शिपाई कंत्राटी कर्मचारी परशुराम पाटोळे आणि ग्रामसेवक संतोषकुमार नागनाथ वाघ (रा. गवत्या मारुती चौक, मोहोळ) यांच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी सांगितले.
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे चे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस अंमलदार- पोह/शिरीषकुमार सोनवणे, पोह/श्रीराम घुगे, पोह/प्रमोद पकाले, पोशि/हाटखिळे पोकॉ/ राजु पवार आणि चालक राहुल गायकवाड (सर्व ने. अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर) यांनी पार पाडली.
....... आवाहन .......
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आले आहे.