Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक घर निहाय सर्वेक्षण सुरू : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


सोलापूर : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात मंगळवारी, 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घर निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना माहिती देऊन सहकार्य करावं, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या वतीने 6 हजार 473 प्रगणक तर 458 पर्यवेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे. हे प्रत्येक गावात व प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. प्रशासनाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व प्रगनक सर्वेक्षणासाठी घरी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. तालुका निहाय प्रगणक व पर्यवेक्षक यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

उत्तर सोलापूर( 231, 16), बार्शी( 921. 56),  दक्षिण सोलापूर (344, 24), अक्कलकोट (582, 39), पंढरपूर (1150, 74), मोहोळ(525, 37), माढा(698, 51), करमाळा (500, 34), मंगळवेढा(499, 42), सांगोला(450, 32) व माळशिरस(573, 53).