एमएसएफडीए कार्यशाळा; एकत्रित कौशल्य अभ्यासक्रमावर मंथन
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महाराष्ट्र राज्यातील १४ जिल्ह्यातील विविध विद्यापीठातील ४० प्राध्यापकांचं ०५ दिवसीय निवासी प्रशिक्षण मंगळवारी, ३० जानेवारी रोजी सुरू झाले. यामध्ये प्रामुख्याने एकत्रित कौशल्य अभ्यासक्रमावर मंथन केले जाणार आहे. त्याचबरोबर तज्ञ व्यक्तींकडून प्राध्यापकांना कौशल्य आणि अभ्यासक्रम याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत बसवराज दामा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएफडीचे समन्वयक सुरज बाबर, कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. श्रीराम राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कोळेकर यांनी कार्यशाळेची रूपरेषा सांगून शिक्षकांना या कार्यशाळेत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली. सहभागी सर्व शिक्षकांसाठी उत्तम निवास व भोजन व्यवस्था दिल्याचे सांगून तज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित केल्याचे सांगितले.
सूरज बाबर यांनी या कार्यशाळेत राज्यातील ११० हून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. मात्र ४० जणांची क्षमता असल्याने तेवढ्याच लोकांना कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले. पुणे, मुंबई, ठाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, संभाजीनगर आदी विविध भागातील शिक्षक यामध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर डॉ. श्रीराम राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ओळी:
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, एमएसएफडीचे समन्वयक सुरज बाबर, कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. श्रीराम राऊत व अन्य छायाचित्रात दिसत आहेत.