Type Here to Get Search Results !

अयोध्या येथील श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने भव्य शोभायात्रा; ०८ करसेवकांचा सत्कार


कासेगांव : अयोध्या येथील श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने सर्वत्र हर्ष उल्हासाचं अन् भक्तिमय वातावरण आहे. श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येपासून जणू दिवाळीची तयारी असल्याचे जाणवत होते. कासेगांव येथे भव्य श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायात्रेचं सोमवारी आयोजन करण्यात आलं होतं. शोभायात्रेत 'जय श्रीराम, प्रभू रामचंद्र की जय ' बजरंग बली की जय' अशा जय घोषानं परिसर दणाणून गेला. शोभायात्रेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


अयोध्या श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा, सोमवारी साजरा होत असताना, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे या निमित्ताने विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात आले होते. ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री बळी मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, मारुती मंदिर परिसर स्वच्छता हाती घेण्यात आली होती. त्यानंतर मंदिरं जलवर्षावानं स्वच्छ करण्यात आली.


गावातील मंदिर परिसरात सोमवारी पहाटे पूर्वीचं सडा मारुन बहुरंगी नयनरम्य रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. गांवच्या मुख्य वेशीसमोरील मारूती मंदिर कट्ट्यावर रविवारी रात्रीपासून डीजे बेस वर ' बनाएगें मंदिर अन् राम महिमा' चा दणदणाट मध्यरात्रीनंतर सुरु होता. गांवकरी उल्हास अन् भक्तिच्या दुहेरी संगमावर सकाळपासून एकत्र येत होते. तिथं ' जय श्रीराम ', 'जय श्रीराम ' जयघोष सुरू होता.



सकाळी पाऊणे दहा वा. च्या सुमारास टाळ-मृदंगाचा निनाद, 'ज्ञानबा-तुकाराम', 'विठ्ठल-रखुमाई' चा नामजप श्रीरामाचा जयघोषात श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळा शोभायात्रेस प्रारंभ झाला. या शोभायात्रेत  जलकलश डोईवर घेतलेल्या सुमारे दीड-दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या. तरूणाई अन् ज्येष्ठ मंडळी भजनात दंग होते तर बाल-गोपालाच्या हातातील शेकडो झेंड्यामुळं संपूर्ण शोभायात्रा ' केशरी ' या दिसत होती. शोभायात्रेत ट्रॅक्टर ट्रॉलीत श्री रामाची भव्य प्रतिमा विराजमान होती.




शोभायात्रा पुन्हा श्री मारुती मंदिराजवळ आल्यावर महिलांनी मंदिरात मारूतीचं दर्शन घेतले, त्यांच्या डोईवरील जलकलशातील पाणी ग्रामदैवत महादेव मंदिरात जलकलशाने जलाभिषेक करण्यात येईल, असंही सांगण्यात आले.



गावभर प्रदक्षिणा झाल्यावर महाप्रसाद वाटपानं या शोभायात्रेची प्रसाद वाटपाने सांगता होईल. त्यानंतर ग्रामस्थांनी अयोध्या येथील श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा 'सुवर्णक्षण ' याची देही, याची डोळा ' अनुभवायचा आहे, असं सरपंच यशपाल वाडकर, उपसरपंच ज्ञानोबा रोकडे, ज्ञानेश्वर कदम, रामहरी चौगुले, सरकार पाटील, प्रविण चौगुले, नितीन वाडकर, सुधाकर शिंदे, सागर सुतार यांनी म्हटलंय. 

......................

स्व. काशिनाथ कदम यांच्याविषयी 

संवेदना व्यक्त : ८ करसेवकांचा सत्कार

शोभायात्रेच्या समारोप आरतीने झाला, तत्पूर्वी , ०६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येला करसेवक म्हणून गेलेल्या कासेगांवातील ०८ करसेवकांचा शोभायात्रा संयोजन समितीच्या शाल, श्रीफल, फेटा बांधून सत्कार करण्यात आला तर स्व. काशिनाथ कदम यांच्याप्रती संवेदना व्यक्त  करण्यात आली. करसेवक शिवाजी जाधव, महेश स्वामी, बाळासाहेब स्वामी, महादेव कादे, ज्ञानेश्वर चव्हाण, अंकुश म्हैत्रे, चंद्रकात कुलकर्णी, शाम जोशी, यांचा सरपंच यशपाल वाडकर यांनी सत्कार केला.

..............

श्री राम मंदिर उभारणीत 

संपूर्ण राष्ट्राचं योगदान : जोशी

आपल्या गांवात शिवाजी जाधव-पाटील मंडळाचे अध्यक्ष होते. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत होते. त्याअगोदर शिलापूजनाचा कार्यक्रम झाला होता. आम्ही करसेवक म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात होतो, बाबरी ढांचा ढासळत असताना जखमी कर सेवकांना पाठीवर घेऊन त्यांना खाली आणण्याचा काम महेश स्वामी करत होते, कर्म-धर्म संयोगाने आम्ही सर्वजण सुखरूप आलो. याच्या स्मृति शाम जोशी यांनी यावेळी बोलताना जाग्या केल्या. शिलापूजनाच्या निमित्ताने आपण सर्वजण सहभागी आहात, करसेवक आहात, राम मंदिर उभारण्यात संपूर्ण राष्ट्राचे योगदान आहे,असेही जोशी यांनी शेवटी सांगितले.