Type Here to Get Search Results !

लोकसभेसाठी भाजपाचे ‘वॅारिअर्स’ होणार सज्ज !



पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी 

घेतला सोलापुरातील तयारीचा आढावा

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोलापूर आणि माढा लोकसभा प्रवास येत्या आठवड्यात होत असून हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपाकडून संघटनात्मक पातळीवर जय्यत तयारी सुरु आहे. शिवाय याच दौऱ्यात सोलापूर आणि माढा लोकसभेतील विधानसभानिहाय ‘वॅारिअर्स’ सोबत प्रदेशाध्यक्ष लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेशा करणार आहे. प्रदेशाध्यक्षांचा दौरा आणि वॅारिअर्सच्या तयारीचा आढावा भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी घेतला. दौऱ्याच्या यशस्वीतेसंदर्भात विविध सूचना मोहोळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

मोहोळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीस खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सोलापूर लोकसभा समन्वयक अमर साबळे, सोलापूर लोकसभा प्रभारी विक्रम देशमुख, सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शहर सरचिटणीस शशिकांत चव्हाण, मनिष देशमुख, विकास वाघमारे, भाजपा पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, भाजयुमो शहराध्यक्ष किरण देशमुख, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, 'भाजपाच्या राज्यव्यापी ‘महाविजय २०२४’ लोकसभा प्रवासात सोलापूर आणि माढा लोकसभा क्षेत्राचा दौरा प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे करत आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. शिवाय ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतील.'

दौऱ्याचे स्वरुप आणि त्यासंदर्भातील विविध मुद्दे यावर सविस्तर चर्चा पदाधिकाऱ्यांशी केली असून प्रदेशाध्यक्षांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी जोमाने कार्यरत आहेत. शिवाय या दौऱ्याच्या अनुषंघाने नियोजित स्थळांची पाहणीही सर्वांसमवेत केली आहे, असेही मोहोळ म्हणाले.

वॅारिअर्सच असणार निवडणुकीचे शिलेदार : मोहोळ

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे वॅारिअर्स महत्त्वाची भूमिका बजावणार असून हेच वॅारिअर्स निवडणुकीचे शिलेदार असणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात या वॅारिअर्सची निवड करून त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.