उज्वल भविष्यासाठी भारत-चीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील : चीनचे कौन्सिल जनरल कॉंग झिंयान हुआ यांची ग्वाही
पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे कौन्सिल जनरल कॉंग झिंयान हुआ यांनी दिली डॉ. कोटणीस स्मारकास भेट
सोलापूर : डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये अडचणीच्या काळात येऊन आरोग्य सेवा दिली. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन ०४ वर्षे रुग्णसेवा केली. रुग्ण सेवा करत असताना त्यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांचे कार्य अतुलनीय आहे. चीन हे कधीही विसरणार नाही. त्यांचा मैत्रीचा वारसा पुढे चालू ठेवणार आहोत, असे सांगतानाच उज्वल भविष्यासाठी भारत-चीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील, अशी ग्वाही चीनचे कौन्सिल जनरल कॉंग झिंयान हुआ यांनी सोलापूर भेटी प्रसंगी दिली.
त्यानंतर सोलापुरातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकास भेट दिली.चीनचे कौन्सिल जनरल कॉंग झिंयान हुआ यांनी येथील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी या स्मारकासंदर्भात अधिक माहिती दिली. चीनचे कौन्सिल जनरल कॉंग झिंयान हुआ यांनी स्मारकातील म्युझियममधील सर्व छायाचित्रे पाहिली.
चीनचे जनरल माओ स्ते यांनी त्यावेळी पाठविलेले कृतज्ञता संदेश पत्र त्यांना दाखविले. त्यासंदर्भात माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. यावेळी निवृत्त पोलीस उपअधीक्षक मोहिते यांनी डॉ. कोटणीस स्मारक येथे घेण्यात येत असलेल्या चायनीज भाषा वर्गाची माहिती दिली.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्या पोळ, Yapp India,ऑटोमोटिव्हचे अध्यक्ष, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, डॉ. कोटणीस स्मारकाचे व्यवस्थापक प्रदीप जोशी, उपअभियंता किशोर सातपुते, उद्यान सह.अधीक्षक स्वप्निल सोलंकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.