४९ वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
अंतिम फेरीत धाराशिव मुलींकडून नाशिकच्या मुली पराभूत
सोलापूरचा गणेश बोरकर व धाराशिव अश्विनी शिंदे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट
नंदूरबार : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि नंदूरबार खो-खो असोसिएशन आयोजित राज्यअजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत मुली गटात धाराशिवने नाशिकचा तर कुमार गटात सोलापूरने पुण्याचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सोलापूरने प्रथमच अजिंक्यपदावर मोहर उमटवली आहे.
नंदूरबार येथे झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशिवने नाशिकचा ७-४ असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून धाराशिवने संरक्षण स्विकारले. त्याला साजेसा खेळ करत धाराशिवची राष्ट्रीय खेळाडू अश्विनी शिंदेने ६.१० मि. संरक्षणाची खेळी करत नाशिकच्या आक्रमणाची हवाच काढून टाकली. तिला मैथिली पवारने (१.३० मि. संरक्षण) व संध्या सुरवसे (नाबाद १ मि. संरक्षण) दमदार खेळी करत चांगली साथ दिली. यामुळे नाशिकला अवघे २ गुणच मिळवता आले. आक्रमणात धाराशिवने ७ गुण मिळवत नाशिकला मोठे आव्हान दिले. मात्र दुसऱ्या डावातील आक्रमणातही नाशिक चांगला खेळ करु शकला नाही. या वेळी संरक्षण करणाऱ्या धाराशिवच्या अश्विनी शिंदेने पुन्हा चमकदार खेळ करत ४.५० मिं. संरक्षण करत नाशिकला मोठी टक्कर दिली. मैथिली पवारने २.३० मिनिटे संरक्षण करत मोठ्या विजयाची संधी मिळवून दिली. यावेळीही नाशिकला २ खेळाडूच बाद करता आल्यामुळे धाराशिवने हा सामना ७-४ असा एक डाव ३ गुणांनी सहज जिंकत राज्य अजिंक्यपद पटकावले. नाशिकतर्फे सरिता दिवा (२.१० मिं. संरक्षण व १ गुण), ऋतुजा सहारे (१.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला. मात्र त्यांना मोठ्या पराभवापासून वाचवता आले नाही.
कुमार गटातील अंतिम सामना चुरशीचा झाला. जादा डावापर्यंत रंगलेल्या सामन्यात सोलापूरने पुण्याचा २४-२३ असा १ गुणाने निसटता विजय मिळवत अजिंक्यपदावर मोहर उमटवली. सोलापूरतर्फे गणेश बोरकर (२.१०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), कृष्णा बनसोडे (१.३०, १.१०, १ मि. संरक्षण व ३ गुण), प्रतिक शिंदे (१.२०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दमदार खेळ करत सोलापूरला कुमार गटात पहिले-वहिले अजिंक्यपद मिळवून दिले. पराभूत पुण्याच्या चेतन बिका (२, २.३०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), भावेश मेश्रे (१.२०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दिलेली कडवी लढत अपुरी ठरली.
स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू :
गणेश बोरकर (सोलापूर) , अश्विनी शिंदे (धाराशिव)
सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू:
चेतन बिका (पुणे), सानिका चाफे (सांगली),
सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू
फराज शेख (सोलापूर), सुहानी धोत्रे (धाराशिव)
सोलापूरच्या कुमार खो खो संघाचा इतिहास : महेश गादेकर सोलापूरच्या कुमार खो खो संघाचे 49व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचेे हे पहिलेच विजेतेपद आहे. या अगोदर 2000-01मध्ये सोलापूरने उपविजेतेपद मिळवले होते. त्यांनी गतविजेत्या ठाण्याला उपांत्य फेरीतच गारद केले होते. अंतिम सामन्यात बरोबरी झाल्यानंतर ज्यादा 9 मिनिटाच्या डावात पुण्यास नमवित राज्याच्या 2023-24च्या क्रमवारीत सोलापूरच्या कुमार संघाने विजेतेपदाची नोंद करीत इतिहास घडविला आहे, अशी प्रतिक्रिया सोलापूर अॅम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी दिली आहे.
मुलींच्या संघाने सातवे स्थान मिळविले असले तरी पुढील वर्षी चांगली तयारी करून ते कामगिरी सुधारतील असा विश्वास आहे.विजेता संघाचे प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे, व्यवस्थापक सिद्धाराम गायकवाड आणि मुलींचे प्रशिक्षक अनिकेत जाधव व व्यवस्थापक सुनिता पवार तसेच उत्कृष्ट संघ निवडलेले निवड समिती सदस्य राजाराम शितोळे, संतोष कदम व प्राध्यापक धोंडीराम पाटील यांचे असोसिएशनच्या वतीने त्यांचे कौतुक केले आहे.
सोलापूरची अंतिम सामन्यातील कामगिरी
गणेश बोरकर (2.10, 2.10 मि. संरक्षण व 2 गुण), कृष्णा बनसोड़े (1.20, 1.10, 1.00 मि. व 3 गुण), प्रतीक शिंदे (1.20, 1.40 मि. व 4 गुण), फराज शेेख़ (1.20, 1.40 मि. 3 गुण), सुजीत मेटकरी (1.20,1.00 मि. व 3 गुण), नीरज कोळी (3 गुण), शाहूराज चंदनशिव (1.20, 1.00 मि. व 2 गुण), अविनाश हरबरे (2 गुण), रोहन रजपूत (1.40मि.), अरमान शेख (1.00 मि. व 1 गुण).