... गाड्यांकडून मोर्चा आता 'हात' गाड्यांकडे !
सोलापूर : रस्त्यात वाहतुकीस अडथळा होईल, अशा रीतीने हातगाड्या लावल्याप्रकरणी बुधवारी, जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात ०३ गुन्हे दाखल करण्यात आले. चार चाकी गाडीवर फळे ड्रायफ्रूट्स विकताना वाहतुकीस अडथळा केल्याच्या आरोपावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे शहर पोलिसांचा दुचाकी चार चाकी वाहनावर कारवाई करता करता त्यांचा मोर्चा 'हात 'गाडीकड्यांकडेही वळला असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर शहरात बेशिस्तपणे वाहन चालवणे रस्त्यात वाहतुकीस अडथळा होईल, अशा बेताने वाहनांचे पार्किंग करणे ही नित्याचीच बाब आहे. शहरात दुचाकी-चारचाकी वाहने पार्क करता येतील, अशी कोणतीही ठिकाणे सोलापूर महानगरपालिकेने अद्याप निश्चित केलेली नाहीत. त्यामुळे सोलापूर शहरात वाहने पार्किंग हा कळीचा मुद्दा आहे, त्यातच भर म्हणून वाहनधारकांचे समुपदेशन व त्यांना आवाहन करण्यापूर्वी वाहने उचलण्याची प्रथा सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू होती.
अलीकडच्या काळात वाहने उचलण्यासाठी असलेले क्रेन्स थांबविण्यात आल्याने वाहने उचला-उचलीचा मुद्दा तात्पुरता थांबलेला असला तरी, वाहतुकीला शिस्त लागल्याचे कुठे दिसत नाही. पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक नियमन करण्याऐवजी त्यांचा कल ऑनलाइन वा ऑफलाइन पावत्या फाडण्याकडे अधिक असतो, अशी अधून मधून नागरिकांतून तक्रार चर्चेस येते.
जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शहाजी दुधाळ यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी दुपारी, मार्केट यार्ड शिवदारे मंगल कार्यालयाच्या बाजूस फळ विक्रीची गाडी वाहतुकीस अडथळा होईल, अशा रीतीने लावून फळे विकल्याप्रकरणी साकीब जीलाणी बागवान (वय-२१ वर्षे, रा- घरनं २४७ जुना विडी घरकुल हैद्राबाद रोड, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दुसऱ्या घटनेत मधला मारुती-मंगळवार पेठ पोलीस चौकी दरम्यान हातगाड्यावर ड्राय फ्रुट्स विकणाऱ्या सलमान मोहम्मद नदाफ (वय-३२ वर्षे, रा- घरनं १०/३९, भवानी पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध पोलीस हवालदार स्वामीदास काळे यांनी फिर्याद दाखल केलीय. बुधवारी सायंकाळी ड्रायफ्रूट ची विक्री करीत असताना त्यांनी त्याची हातगाडी वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने लावली होती, असे काळे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटलंय.
तिसऱ्या घटनेत, बुधवारी सायंकाळी कुंभार वेशीत मल्लिनाथ चन्नविरप्पा धुमगोडा (वय-४१ वर्षे, रा- ३९९ स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, सोलापूर) याने त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहन कागदी पुठ्ठे भरण्यासाठी मुख्य रस्त्यावर उभा करून बाजूस गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर जेथे रस्त्याने येणारे-जाणारे लोकांना अडथळा निर्माण होईल, त्यांचे जिवीतास धोका निर्माण होईल, अशा स्थितीत मिळून आला. त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल गणेश क्षीरसागर यांनी फिर्याद दाखल केली आहे.