सोलापूर : गेली ८ वर्षे लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव करते आहे. लोकमंगल साहित्य पुरस्काराचं हे नववं वर्ष असून यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी शांता गोखले (मुंबई), राजू बाविस्कर (पुणे) आणि वसंत गायकवाड (पुणे) यांची निवड करण्यात आलीय. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, ७ जानेवारी रोजी सायंकाळी ०६ वा. किर्लोस्कर सभागृहात (चार हुतात्मा पुतळा जवळ) प्रमुख अतिथी राजीव खांडेकर (संपादक, एबीपी माझा, एबीपी न्यूज, मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी सकाळी एका पत्रकार परिषदेत दिली.
सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार • झांबळ - कथासंग्रह - समीर गायकवाड (मनोविकास प्रकाशन) यांना प्रदान करण्यात येतोय. ११ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं पुरस्काराचे स्वरूप आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटले.
नीतिन वैद्य, प्रा. डॉ. ऋचा कांबळे, शिरीष देखणे व डॉ. दत्ता घोलप हे पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत. या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली या काम पाहत आहेत.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित रहावे, असं आवाहन लोकमंगल साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केली आहे.
.........
लोकमंगल चं कार्य
येथील लोकमंगल हा ग्रुप सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. निराधार वृद्धांना भोजनाचे डबे, सामुदायिक विवाह सोहळा, आदिवासी मुला-मुलींसाठी शाळा, लोकमंगल कॉलेजेस, कला, क्रीडा, लोकमंगल मैत्र दिवाळी अंक, कलाभूमी अॅम्फी थिएटर, रेडिओ भूमी ९०.४ एफ एम व चित्रपट प्रशिक्षण अशा अनेक विविध योजना लोकमंगल राबवत आहे.