Type Here to Get Search Results !

सर्व आमदारांच्या पी.ए. यांच्या समवेत जिल्हा प्रशासनाची बैठक घेण्याचा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण प्रयोग !



आमदाराच्या मागण्याबाबत सर्व संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

सर्व शासकीय विभागांनी अल्पसंख्याकांच्या योजनांच्या अनुषंगाने बैठकीत व्यवस्थित माहिती सादर करावी

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या मतदारसंघातील विविध विकासात्मक कामे व अन्य प्रश्नाच्या अनुषंगाने असलेल्या विविध मागण्यावर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून त्या मागण्या व प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व आमदारांच्या पी.ए. यांच्या समवेत जिल्हा प्रशासनाची बैठक घेण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे.

त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्या स्वीय सहाय्यकांसोबत जिल्हा प्रशासनाची यापूर्वी झालेल्या बैठकीत पीए यांनी संबंधित आमदाराच्या वतीने मतदारसंघातील विविध कामाबाबत उपस्थित केलेल्या मागण्या, प्रश्न या बाबत सर्व संबंधित विभागानी केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन सदरची सर्व कामे संबंधित विभागाने त्वरित मार्गी काढावीत असे निर्देश दिले. 

येथील बहुतांश प्रश्न सोडवण्यात संबंधित विभाग यशस्वी झालेले आहेत. तरी उर्वरित जिल्हा प्रशासन स्तरावरील अनेक कामे मार्गी लागलेले असून ज्या कामात राज्य शासनाकडून मंजुरी अथवा निर्देश मिळणे आवश्यक आहे, त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून तेही कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सुचित केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जिल्हा प्रशासन व सर्व आमदारांचे पी.ए. यांच्या समवेत झालेल्या पहिल्या बैठकीत त्यांनी मांडलेले प्रश्न, मागण्या याबाबत सर्व विभागाची विभाग निहाय माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आमदाराच्या पी. ए. यांच्या मागण्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीस अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोम्पे, पोलीस शहर उपायुक्त पी.एन. सोनवणे, महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर उपस्थित होते.

अल्पसंख्यांकांच्या योजनांचा आढावा

शनिवारी, २३डिसेंबर रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात अल्पसंख्याक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता बैठक घेणार आहेत. 

तरी या बैठकीच्या अनुषंगाने अल्पसंख्याकाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागांची माहिती व आकडेवारी व्यवस्थितपणे आयोगाच्या सदस्यासमोर सादर करावी, यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती.

यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजाच्या असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांचे प्रश्न सर्व संबंधित विभागांनी त्वरित सोडवावेत तसेच प्रत्येक विभागाने त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या अनुषंगाने आढावा जिल्हाधिकारी यांनी घेऊन सर्व संबंधित विभाग प्रमुखांना मार्गदर्शक सूचना दिल्या.



प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली तसेच सर्व संबंधित विभागांनी बैठकीत व्यवस्थित माहिती सादर करावी असे निर्देशित केले. या बैठकीत सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.