पाठीमागून वार करणारे हे मराठे असूच शकत नाहीत : अस्मिता गायकवाड
सोलापूर : मी स्वतः ९६ कुळी मराठा आहे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत, म्हणून असे पाठीमागून वार करत नाही. पाठीमागून वार करणारे मराठे असूच शकत नाहीत, हल्ली समाजकंटकांना उभं करण्यामागे विरोधकांचे खूप मोठे षडयंत्र असल्याचा दावा करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांकडे केलीय.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यात घडलेल्या घटनेनंतर 'त्या' प्रयत्नांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, समाजकंटकावर वेळीच कारवाई करून पायबंद घालावा, अशी मागणी घेऊन शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड यांनी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांना निवेदन दिले, त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
२०२४ ची लोकसभा आणि संभाव्य विधानसभा निवडणुका लक्षात घेता, सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध पक्षांच्या अनेक नेत्यांचे दौरे होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी पोलीस प्रशासन घेतच असते. त्यातही समाजकंटकांच्या कारस्थानामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता अधिक असते.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याच्या दक्षतेचा भाग म्हणून समाज स्वास्थ्य बिगडवू पाहणाऱ्या समाजकंटकां वेळीच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कायदा व सुव्यवस्था बिघडू न देण्याचे काम जबाबदारी शासन व प्रशासन यांच्यावर आहे. उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेना पक्षाला जनतेतून प्रचंड समर्थन मिळत आहे. त्यामुळे विरोधकांची पाया खालची वाळू घसरू लागली आहे. अशा समाजकंटकांच्या आडून षडयंत्रकारी वर्ग, असे घृणास्पद प्रकार करीत आहेत.
या षडयंत्रकारी कृत्यामागे जी असंतुष्टकारी लोक आहेत, त्याचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर अघ्या सोलापुरातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात शांतता व सुव्ययवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊन अनर्थ घडू शकतो. यापुढे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध कोणतेही कट कारस्थान खपवून घेतले जाणार नाही, त्याचे जे गंभीर परिणाम होतील, त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील, असा इशाराही महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका जोहरा रंगरेज, उपजिल्हा संघटिका ज्योती माळवदकर, प्रीति नायर, स्वाती रुपनर, उपशहर संघटिका सुरेखा वाडकर, कविता पवार, माया थोरात, रेखा राठोड आदी उपस्थित होते.