बार्शी : महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ३९ वे राष्ट्रीय अधिवेशन परभणी येथे दि.२८ ते ३० डिसेंबर दरम्यान पार पडले. इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफीकल रिसर्च नवी दिल्ली आणि बी. रघुनाथ महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले.
संतांचे धर्मचिंतन आणि लोकशाही समोरील आव्हाने या दोन मुख्य विषयांसह तत्त्वज्ञानाशी संबंधीत इतर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने आणि शोधनिबंध सादर केले गेले. डॉ. अपर्णा जिरवणकर लिखीत वीरशैव संस्कृत वाड्मय या ग्रंथाची निवड करुन त्यांना डॉ. सूर्यकांत घुगरे संशोधनग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार डॉ. सूर्यकांत घुगरे यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
डॉ. अपर्णा जिरवणकर या गेल्या तीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असूनही संशोधनात्मक लेखनामध्ये त्यांची अभिरुची दिसून येते. यावेळी अध्यक्षस्थानी अॅड्. अशोक सोनी होते.
उद्घाटक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार लातूर, संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अमित वाल्मिकी मुंबई, डॉ. प्रदिप गोखले पुणे, सुरेश शेळके, डॉ. परमेश्वरन शेषाद्री, परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनिल गवरे, डॉ. अमन बगाडे, डॉ. ग्यानदेव उपाडे, प्राचार्य डॉ. विलास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही विषयाचे महत्त्व वाढण्यासाठी त्या विषयातील संशोधनात्मक अध्ययनाची आवश्यकता असते. हा उद्देश सफल होण्यासाठी अशा पुरस्कारांनी लेखकांना सन्मानीत केले जाते. पुरस्कारासाठी संशोधकांची निवड करताना लेखकाने लक्षात घेतलेले संशोधनमूल्य प्राधान्याने विचारात घेतले जाते.