सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेला मनोज ज्वेलर्स या सराफी दुकानातील चोरीसह ०३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आला आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या पथकाने, सराफी दुकानातील चोरीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातून काला कौवा गजाआड केला. जाहिद उर्फ हैदरअली उर्फ काला कौवा जावेदअली इराणी असं त्याचं नांव आहे.त्यानं मनोज ज्वेलर्समधून चोरलेल्या ०४ सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या. त्याची किंमत ०२ लाख ३२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
मनोज ज्वेलर्स या सराफी दुकानातून चोरट्याने ४०.७५० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सूचना आणि मार्गदर्शन यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरगुडे व त्यांच्या पथकाने त्यांना मिळालेल्या खबरीनुसार शेजारच्या कर्नाटक राज्यातील चिद्री बिदर रोड येथून जाहिद उर्फ हैदरअली उर्फ काला कौवा याच्या मुसक्या आवळल्या. सदर आरोपीस पुढील कारवाईकामी जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले. रजा हुसेन उर्फ रजिया अफसर अली इराणी असं त्याच्या साथीदाराचे नाव असून पोलीस त्याच्या मागावर असल्याचे सांगण्यात आले.
गुन्हे शाखेचे स.पो.नि. विजय पाटील, पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपी नामे आदित्य ऊर्फ पोत्या बसवराज दोडमणी, (वय-२८ वर्ष, धंदा-बेकार, रा. घर नं.७११ बिलाल नगर, नडगिरी पेट्रोल पंपाजवळ, विजापुर रोड, सोलापूर) याच्या ताब्यातून सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली एच एफ डिलक्स मोटारसायकल व रेडिओ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेला लॅपटॉप हस्तगत केला. त्याची अनुक्रमे किंमत ३० हजार रुपये व ५५ हजार रुपये आहे. अशा प्रकारे ०३ चोरीचे गुन्ह्यातील ३ लाख १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे,वपोनि (गुन्हे, अति. कार्य.)
राजेंद्र बहिरट, यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि जीवन निरगुडे, सपोनि विजय पाटील, पोसई अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.