कुक्कटपालन व्यवसाय शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे साधन : अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिनकर
सोलापूर : शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला शेती पुरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चित वाढ होते. कुक्कुटपालन हा व्यवसाय नगदी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक चालना मिळणार असून, हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शाश्वत आर्थिक उत्पनाचे साधन असल्याचे जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे २८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त समीर बोरकर, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, पशुधन विकास अधिकारी स्नेहंका बोधनकर, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस.पी.माने उपस्थित होते.
कुक्कुटपालन प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रयोग प्रत्यक्ष कृतीत आणावा तसेच या उद्योगाबाबत बँकेच्या अडचणी आल्यास संबंधित गटविकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असेही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी केले. तर सधन कुक्कुट विकास गटचे प्रमुख व पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी प्रशिक्षणाची यशोगाथा विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस.पी.माने यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जमादार व चव्हाण यांनी परिश्रम घेतले. तरी पुढील तुकडीस जिल्ह्यातील पशु पालकांनी नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी केले आहे.