Type Here to Get Search Results !

साई सुपर मार्केटच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री गोविंद देव गिरी महाराज यांची ज्ञानेश्वरी भावकथा



सोलापूर : येथील साई सुपर मार्केटच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या श्री ज्ञानेश्वरी भावकथेचे आयोजन २ ते ८ जानेवारी करण्यात आले आहे, अशी माहिती मुकुंद भट्टड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री गोविंददेव गिरी महाराज हे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष असून मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या मधाळ आणि प्रगल्भ वाणीचा लाभ सोलापूरकरांना यानिमित्ताने होत आहे. श्री. गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ज्ञानेश्वरी भावकथेमुळे साक्षात ज्ञानगंगा आपल्या अंगणी अवतरीत होणार आहे, असे विष्णुदास मुंदडा यांनी स्पष्ट केले.


साई सुपर मार्केटची पहिली शाखा, ११ डिसेंबर १९९८ रोजी सात रस्ता येथे सुरू झाली. पूजा सामग्रीपासून घरात लागणाऱ्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी लहान मोठ्या पॅकिंगमध्ये व प्रत्येक माल बारकोडींगद्वारे विक्रीस उपलब्ध करून देण्याची संकल्पना साई सुपर ने सोलापुरात प्रथमच सुरू केली. साई सुपर मार्केटच्या पाचही शाखांचे व्यवहार पूर्णतः संगणकीकृत करण्यात आलेले आहेत. साई सुपरच्या सध्या सात रस्ता, विजापूर रोड, दमाणी नगर, अक्कलकोट रोड आणि वसंत विहार अशा एकूण पाच शाखा आहेत, विष्णुदास मुंदडा यांनी पत्रकारांशी बोलताना प्रारंभी सांगितले.


रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साई सुपर मार्केटद्वारे ग्राहकांसाठी १००० रूपयांच्या खरेदीवर ५०० चे फ्री शॉपिंग व्हाऊचर योजनाद्वारे ०५ ही शाखांमध्ये एकूण १०१ भाग्यवंतांना जिंकण्याची संधी दिली. याशिवाय साई सुपर मार्केटने रौप्य महोत्सवी वर्षात ग्राहक मेळावा, व्यावसायिक वितरक आणि प्रतिनिधींचा स्नेह-मेळावा असे विविध उपक्रम राबविले असल्याचे संचालक मुंदडा यांनी सांगितले. 

साई सुपर मार्केटतर्फे प्रतिवर्षी समाज उपयोगी उपक्रमही राबविले जातात. त्यामध्ये रिमांड होम तसेच विविध अन्नछत्रांना आवश्यक धान्य दान, कोविड काळात गरजूंना धान्य वाटपही केले. महानगरपालिकेचं निशय योजनेअंतर्गत २५ कुष्ठरोग्यांना आवश्यक वस्तूंचे किट ही प्रतिमाह दिली आहे, असं विष्णुदास मुंदडा यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेस संचालक सर्वश्री धनेश केकडे, बालकिशन बिहाणी, लक्ष्मीनारायण बाहेती, भगीरथ (लालू) खंडेलवाल उपस्थित होते.

.............

ज्ञानेश्वरी भावकथा सप्ताह आणि शोभायात्रेचेही आयोजन

श्री ज्ञानेश्वरी भाव कथा दि. २ ते ७ जानेवारी दररोज दुपारी ३:३० ते ७:३० तर सोमवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दु. १२.३० या वेळेत दमाणीनगर येथील शुभम हॉल ग्राउंडवर होणार आहे. त्याचप्रमाणे दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायणसाठी नोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी साई सुपर मार्केटच्या कोणत्याही एका शाखेत ३१ डिसेंबरपर्यंत नावे नोंदवायची आहेत. शोभा यात्रा दि. २ जानेवारी रोजी दुपारी २. वाजता दमाणी नगर येथील स्वादीष्ट हॉटेल जवळील गणेश मंदिरापासून निघणार आहे, असंही मुंदडा यांनी यावेळी सांगितले.