अंतिम फेरीत कुमारांमध्ये सोलापूर विरूध्द पुणे
४९ वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
मुलींमध्ये धाराशिव विरूध्द नाशिक भिडणार
सोलापूर : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि नंदूरबार खो-खो असोसिएशन आयोजित राज्यअजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत मुली गटात धाराशिव विरूध्द नाशिक तर कुमार गटात सोलापूर विरूध्द पुणे असा अंतिम सामना रंगणार आहे.
शहादा ( जि. नंदूरबार) येथील मैदानावर सुरु असलेल्या राज्यअजिंक्यपद खो-खो स्पर्धेत गुरुवारी उपांत्य फेरीचे सामने रंगले. मुलांच्या गटात सोलापूरने सांगलीचा १४-१३ असा १ मिनिट राखून १ गुणाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. सोलापूरतर्फे गणेश बोरकर (२.१०, २.२० मि. संरक्षण व ३ गुण), शंभूराज चंदनशिव (१.४०, २ मि. संरक्षण व १ गुण), प्रतिक शिंदे (१, १.१० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी अष्टपैलु खेळ केला. पराभूत सांगलीतर्फे आयुश लाड (१.४० मि. संरक्षण व १ गुण), ओम पाटील (१.२०, २.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला.
चुरशीच्या झालेल्या मुलांच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुण्याने धाराशिवचा १४-१३ असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने पराभव केला. तेजस जाधव (२.१०, २.२० मि. संरक्षण व २ गुण), चेतन बिका (१.२०, १.४० मि. संरक्षण व ३ गुण), भावेश मेश्रे (१, १.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पुण्याने विजय मिळवला. धाराशिवतर्फे श्रीशंभू पेठे (२, १.२० मि. संरक्षण), भगतसिंग वसावे (१.३०, २.२० मि. संरक्षण व १ गुण), रमेश वसावे (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), राज जाधव (३ गुण) यांनी चांगला खेळ केला पण त्यांना विजयश्री खेचून आणता आली नाही.
मुली गटात धाराशिवने सांगलीचा १२-७ असा एक डाव ५ गुणांनी पराभव केला. धाराशिवतर्फे अश्विनी शिंदे (४.३० मि. संरक्षण व १ गुण), संध्या सुरवसे (२.२०, २.३० मि. संरक्षण व २ गुण), प्रणाली काळे (२.३० मि. संरक्षण व १ गुण), सुहानी धोत्रे (६ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर पराभूत सांगलीतर्फे सानिका चाफे (१.४० मि. संरक्षण व १ गुण), रिया खैरमोडे (१.१० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.
मुली गटातील दुसऱ्या सामन्यात नाशिकने ठाण्याला १०-९ असा १.१० मिनिटे राखून १ गुणाने पराभूत केले. नाशिकतर्फे सरिता दिवा (२.४०, ३.०० मि. संरक्षण व ३ गुण), ज्योती मेढे (२.१०, १.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी तर पराभूत ठाण्यातर्फे दिव्या गायकवाड (२, ३ मि. संरक्षण व १ गुण), सान्वी तळवडेकर (२.४०, १.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला.