एक ही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची घ्यावी दक्षता : पाटील
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात २९ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर या कालावधीत अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, पपई, डाळिंब, कांदा, टोमॅटो, ज्वारी, हरभरा, तूर, गहू,आदी पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करावी. कोणीही आपत्तीग्रस्त शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची माहिती त्यांनी घेऊन एक ही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.