सोलापूर : श्रीक्षेत्र अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे गुरूवारी, २८ डिसेंबर रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे आगमन झाले. या मंगल कलशाचे सरपंच यशपाल वाडकर यांनी गावाच्या वेशीवर स्वागत केले. 'जय श्रीराम' च्या घोषणांसह हा मंगल कलश श्रीसंत सावता माळी मंदिरात नेण्यात आला. जय श्रीराम च्या घोषणांसह टाळ मृदुंगाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.
अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्या कार्यक्रमासाठीच्या निमंत्रणरुपी अक्षता समस्त देशवासियांना देण्यात येणार आहेत. त्या अक्षता थेट अयोध्येहून मंगल कलशात आणल्या आहेत.
मंदिरात मंगल कलशाचे सरपंच वाडकर यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी करसेवक शिवाजी जाधव-पाटील, श्याम जोशी, बाळासाहेब स्वामी, महेश स्वामी, महादेव कादे, ज्ञानदेव चव्हाण यांचा सरपंच वाडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्यानंतर मंगल कलशाची टाळ मृदंगाच्या गजरात 'जय श्रीराम' च्या जयघोषात गावातून मिरवणूक काढण्यात आली. मंगल कलशाचे प्रत्येक घरासमोर स्वागत व पूजन करण्यात येत होते. मिरवणूक मार्गावर प्रत्येक घरासमोर सडसंमार्जनासह रांगोळी काढण्यात आली होती.
यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, ग्रामपंचायत सदस्य भारत जाधव, लक्ष्मण वाडकर, सुरेखा चौगुले, माजी सदस्य रामहरी चौगुले, ज्ञानेश्वर कदम, हणमंत काळे, अशोक काटकर, सागर सुतार, अर्जून हुडकर, हरिदास वाडकर, धर्मराज वाडकर, सुधीर चौगुले, ओंकार येणगुरे, चैतन्य वाडकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.