एकलव्य मॉडेल निवासी शाळा प्रवेशासाठी
१९ फेब्रुवारीपर्यंत करावेत अर्ज
सोलापूर : आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात कार्यान्वित असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये इयत्ता 6 वी च्या वर्गात नविन प्रवेशासाठी तसेच इयत्ता 7 ते 9 वी च्या वर्गातील अनुषेश भरून काढण्यासाठी अनुसूचित आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश द्यावयाचा आहे. अनुसूचित आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी दि.19 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी केले आहे.
एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये प्रतिवर्षी इयत्ता 6 वीच्या वर्गामध्ये 30 मुली व 30 मुले असे एकूण 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. तसेच इयत्ता 7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यात येतो. अनु.जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के जागा तसेच आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एकुण 5 जागा आरक्षित राहतील.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात एकलव्य मॉडेल निवासी शाळेमधील इयत्ता 6 वी च्या वर्गात नविन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अनुशेष भरून काढण्यासाठी तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी , इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित आदिम जमातीच्या विद्यार्थांसाठी रविवार दि.25 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वा ते दुपारी 1.00 या वेळेत व इ.6 वी व इ.7 वी ते इ.9 वी साठी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वा. या वेळेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होटगी, ता दक्षिण सोलापूर जि. सोलापूर या आश्रमशाळेत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय व अनुदानित आश्रमशाळेसह जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित आदिम जमातीचे विद्यार्थी दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत या कार्यालयास प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. विहीत नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालयाकडुन प्राप्त करून घ्यावेत. अनुसुचित आदिम जमातीच्या ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. ०६ लाखांपेक्षा अधिक आहे, अशा पालकांच्या पाल्यांना सदर परीक्षेस प्रविष्ठ होता येणार नाही.
सविस्तर माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालयाच्या वरील मजल्यावर सिध्देश्वर पेठ, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर प्र. सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) श्री.पी.व्ही.परचाके, (मोबाईल क्रमांक.7350320276) येथे संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. गायकवाड यांनी केले आहे.