मारहाणीत मुला-मुलीचे बारीक-बारीक तुकडे करण्याची
धमकी; चाकूहल्लाप्रकरणी ०६ जणांविरुध्द गुन्हा दाखल
सोलापूर : पत्नी व मुलीने पोलिसात फिर्याद दिल्याचा रोष मनात धरून कल्लाप्पा पुजारी व अन्य पाच जणांनी तिच्या पतीस जबर मारहाण करून बारीक-बारीक तुकडे करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पुणे नाका स्मशानभूमीजवळ सोमवारी, ११ डिसेंबर रोजी दुपारी घडली. देवी भाऊ राऊत असं जखमीचं नाव आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ०६ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी येथील रहिवासी देविदास राऊत (वय-४७ वर्षे) याला कल्लप्पा पुजारी व अन्य पाच जणांनी वरील नमूद कारणावरून स्मशानभूमी जवळ गाठून लोखंडी पाईप व चाकूने वार करून जखमी केले. त्यात त्याच्या डाव्या कानात तसेच डोकीवर दुखापत झाली. त्यावेळी अन्य दोन अनोळखी इसमांनी शिवीगाळी करीत लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली.
या मारहाणीत देविदास राऊत यांच्या जवळील मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन फोडून टाकण्यात आला. त्याचवेळी त्याच्या हाताच्या बोटातील एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी त्यांच्यापैकीच कोणीतरी काढून घेतली. दरम्यान जावई आकाश बोंद्रे यांनी राऊत यांची मुलगी नेहा व मुलगा राहुल याचे बारीक-बारीक तुकडे करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी कल्लाप्पा पुजारी, जावई आकाश बोंद्रे, विष्णू बोंद्रे, सुरेश बोंद्रे आणि अन्य ओळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.