सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शुक्रवारी सोलापूर शहर परिसरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत मा. न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह पाच मद्यपी ग्राहकांना पासष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच विभागाने शहरात एका दुचाकीवरुन वाहतूक होणारी शंभर लिटर हातभट्टी दारुही जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (२९, डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने सोलापूर-तुळजापूर रोडवरील शेळगी हद्दीतील होटेल तुळजाई या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक तानाजी भाऊराव जाधव (वय - ६८ वर्षे) हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याचेसह दोन मद्यपी ग्राहक नारायण धनराज उजलंबे व लक्ष्मण बाबूराव बनसोडे यांना अटक करण्यात आली.
एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने वडाळा (ता. उत्तर सोलापूर) हद्दीतील होटेल साईराज या ठिकाणी छापा टाकून होटेल चालक महेंद्र भिमराव भगत (वय ३२ वर्षे) व तीन मद्यपी ग्राहक बबन केशव जाधव, सुशांत मल्लिकार्जुन फंड व श्रीकांत बिभिषण भिसे यांना अटक केली.
दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिका-यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, दारुबंदी न्यायालय यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा अशी शिक्षा सुनावली असता सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम पासष्ट हजार मा. न्यायालयात जमा केली.
एका अन्य कारवाईत शनिवारी दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने मोमीन नगर परिसरात दुपारी पाळत ठेवली असता एका बजाज डिस्कवर कंपनीच्या दुचाकी क्र. MH 13 BG 0807 वरुन दोन कापडी पिशव्यांमध्ये ५० लिटर क्षमतेच्या दोन रबरी ट्यूबमध्ये शंभर लिटर दारुची वाहतूक होत असतांना आढळून आल्याने दुचाकीचा पाठलाग केला असता दुचाकीस्वार वाहन जागीच सोडून पसार झाला. त्याला फरार घोषित करुन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक सूरज कुसळे, निरिक्षक राहूल बांगर, सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे, उषाकिरण मिसाळ, रोहिणी गुरव, अक्षय भरते, सहायक दुय्यम निरिक्षक अलीम शेख, गजानन होळकर, जवान चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे, किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
.........आवाहन........
नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून ३१ डिसेंबरकरिता जिल्हाभरात १२ पथके नेमण्यात आली असून यात निरिक्षक, दुय्यम निरिक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याचसोबत जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात रात्रगस्ती घालून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतूकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच ढाबा/होटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे.
३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पार्ट्यांवर विभागाचे कडक लक्ष राहणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील. ज्या होटेल्सना न्यू ईअर पार्ट्यांचे आयोजन करावयाचे आहे, त्यांनी त्याठिकाणी मद्याचे वितरण करण्यासाठी या विभागाकडून रीतसर वनडे क्लब लायसंस घ्यावे, अन्यथा अशा होटेल्सचे मालक व आयोजकांविरुद्धही कारवाई करण्यात येईल.
नितिन धार्मिक,
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर.