आरोग्य शिबिरासाठी आलेल्या सर्व डॉक्टरांचं आम्ही ऋणी आहोत : सरपंच यशपाल वाडकर
श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित सर्व रोग निदान शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी
कासेगांव : श्री खंडोबा यात्रेनिमित्त कासेगांव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी, १७ डिसेंबर रोजी भव्य सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले. डॉ. प्रविण खारे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहून सर्व डॉक्टरांनी आमच्या कार्याला बळ दिलं आहे. आम्ही शिबिरासाठी आलेल्या सर्व डॉक्टरांचं आम्ही ऋणी आहोत, असा कृतज्ञ भाव सरपंच यशपाल वाडकर यांनी व्यक्त केला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे कासेगाव महोत्सव अंतर्गत, रविवारी, १७ डिसेंबर रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सोलापूर इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष ब्रह्मानंद ढेकळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दूधभाते, उद्योजक सुदेश देशमुख, सरपंच यशपाल वाडकर, डॉ.मोहन शेगर (सहसंचालक कुष्ठरोग सेवा), उद्योजक कैलास संतानी, ज्येष्ठ पत्रकार शंकर जाधव, माजी नगरसेविका सौ. संगिता जाधव यांच्यासह अन्य पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी सर्व निमंत्रितांचा सरपंच यशपाल वाडकर आणि अन्य ग्रामस्थांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
कासेगांव महोत्सवात गावातील प्रमुख गल्ली-चौकात नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबीराचा भाग म्हणून रक्त-लघवी तपासणीसह अन्य तपासण्या करून त्याचे वैद्यकीय अहवाल (रिपोर्टस्) ग्रामस्थांना देण्यात आले होते. रविवारच्या आरोग्य शिबिरात त्या रिपोर्टनुसार डॉक्टरांनी औषधे देऊन रुग्णांना निरोगी राहण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीसंबंधी मार्गदर्शन केले.
रस्ते, लाईट, पाणी या ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांच्या पलिकडं जाऊन आरोग्य, शिक्षण क्षेत्रात काही वेगळं करण्याचा करण्याच्या प्रयत्नातून आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी ग्रामस्थांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, ते सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी होत असताना दिसते, याचा आनंद आहे, असेही सरपंच यशपाल वाडकर यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक सुदेश देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दूधभाते, डॉ. प्रविण खारे, डॉ. अर्चना खारे (स्त्रीरोग तज्ञ) डॉ. अरुण पाठवदे (समुदाय आरोग्य अधिकारी), डॉ. सायली चांदेकर (समुदाय आरोग्य अधिकारी), बोरामणी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कुमार, माजी सरपंच नेताजी पाटील, शंकरराव येणगुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि श्री खंडोबाच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
या सर्व रोग निदान शिबिरात डॉ. दीपक गायकवाड (हृदयरोग तज्ञ), डॉ. प्रवीण पटणे (किडनी रोग तज्ञ), डॉ. स्नेहल नडगीरे, डॉ. हर्षवर्धन जोशी (पोटविकार रोग तज्ञ), डॉ. प्रताप चौरे (जनरल मेडिसिन तज्ञ), डॉ. जी. आर. बबलादी (अस्थिरोग तज्ञ), डॉ. शाहील मेहता (बालरोग तज्ञ), डॉ. प्रभाकर होळीकट्टी (मानसोपचार तज्ञ), डॉ. किशोर शिवगुंडे, डॉ. सोमनाथ बोराडे (नेत्रचिकित्सा ऑफिसर), यांच्यासह विविध रोग आणि आजारावरील तज्ञ डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. त्यांनी शिबीरात ५०० हून अधिक ग्रामस्थांची रोग निदान केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दैनिक संचारचे प्रतिनिधी सुभाष येणगुरे व उपाध्यक्षपदी कोमल ज्योतिबा राऊत यांची निवड झाल्याबद्दल सरपंच यशपाल वाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश वाडकर यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री खंडोबा देवस्थान पंच कमिठीबरोबरच स्थानिक नियमित रूग्णसेवेत असलेले डॉ. राजकुमार इटुकडे, डॉ. रामलिंग घंटे, डॉ. समाधान अंबुरे, डॉ. एस. एन. गाडेकर, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक बालाजी चौगुले, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, अजित जाधव, राजाराम पाटोळे, गोपाळ हेडे आदींनी परिश्रम घेतले.
...................................
... याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा : डॉ. प्रवीण खारे
श्रीखंडोबा यात्रा पंच कमिटीनं सर्वरोग निदान शिबीराचं आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. या शिबीरात आलेल्या सर्व डॉक्टरांचे पत्रिकेत नाव टाकलं, त्यानंतर डॉक्टरांना कळविण्यात आले होते, ते सर्वच डॉक्टर्स आले आहेत, इतक्या डॉक्टर्सनी येऊन माझ्या एका हाकेला प्रतिसाद दिला, त्याबद्दल भारावून गेलो. पूर्वी स्थूलपणा श्रीमंताचा आजार म्हणून पाहिला जायचा, शेतावर कष्ट करणाऱ्या श्रमकऱ्यांमध्ये स्थूलपणा दिसत नव्हता, आता तिथेही दिसतोय, या आजारावर तज्ञ डॉक्टर्स बोलविण्यात आलेले आहेत, त्याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. प्रवीण खारे यांनी केले.
...................................
ज्याचं आरोग्य चांगलं आहे, तो जगातील
सर्वात श्रीमंत माणूस : डॉ. मोहन शेगर
ज्याचं आरोग्य चांगलं आहे, तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीत, आपल्या रोगाचा निदान लवकर होणं गरजेचं असतं. रक्तदाब, शर्करा रोग, याचे वेळेवर निदान होत नाही, त्यावेळी त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो अथवा अर्धांगवायूचा झटका येतो, रोग निदान झालं तर त्यावर उपचार करून आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो, या शिबिराच्या आयोजनाबद्दल डॉ. खारे आणि सरपंच वाडकर यांना शुभेच्छा देतो, असं डॉ. मोहन शेगर यांनी सांगितले.