सोलापूर : जिल्ह्यासाठी मंजूर झालेले २०० कोटी रुपयांचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्रच बारामतीला पळवण्यात आले आहे. संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष शिवश्री श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुरूवारी सायंकाळी शासन अद्यादेशाची होळी करण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्ह्यातील सर्व सत्ताधारी भाजप आमदारांच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविण्यात आला.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळेच प्रकल्प बारामतीला पळवण्यात आल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मुंबईत वजन वापरून निर्णय फिरवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी जीआरचा सोयीचा अर्थ लावण्याची कसरत करीत असल्याचे दिसून येत आहेत.
सोलापुरातील अन्न उत्कृष्टता केंद्राची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांचा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. त्यामुळे त्यांनी एसएमएस केला. जिल्ह्यात सत्ताधारी भाजप पक्षाचे दहा आमदार असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांना थेट संपर्क करून स्पष्टता समोर आणण्यात ते का कमी पडले, असा सामान्यांचा सवाल आहे.
गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र आलेल्या संभाजी आरमार चे संस्थापक श्रीकांत डांगे आणि संभाजी आरमारच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सरकारचा आणि जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदार- खासदारांचा निषेध करून शासन अद्यादेशाची होळी केली.