Type Here to Get Search Results !

पैशाच्या व्यवहारातून तुला खूप मस्ती आलीय; सळईने प्रहार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न !


  (प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : पैशाच्या व्यवहारातून, तुला खुप मस्ती आली आहे. थांब तुला जिवे ठार मारुनच टाकतो, असे म्हणून रोहन संतोष पुजारी (वय २२ वर्षे) याच्या डोक्यात लोखंडी सळईने प्रहार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही घटना विजापूर रस्त्यावरील अशोक नगर येथील पुजारी यांच्या दुकानात शुक्रवारी. दुपारी घडली. जखमी रोहन पुजारी याच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी राज जाधव (रा. सेटलमेंट) व त्याच्या अन्य तीन साथीदारांविरुध्द काल गुन्हा दाखल केला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अशोक नगर येथे रोहन पुजारी याचे स्क्रॅपचे दुकान आहे. या दुकानात आलेल्या राज जाधव याने वरील नमूद कारणावरुन रोहन याच्या डोक्यात लोखंडी सळईने प्रहार केला. त्यात रोहन यास भोवळ आल्याने तो खाली जमीनीवर पडला. 

तो जखमी अवस्थेत जमीनीवर पडल्यानंतर  आरोपीतांनी त्यांच्या हातामध्ये असलेल्या हॉकी स्टीक व क्रिकेटच्या स्टंपने फिर्यादीच्या दोन्ही हाताला व उजव्या डोळ्याच्या आजुबाजूस जोरजोरात मारुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमीच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी काल सायंकाळी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.