मनपा उपायुक्त घोलप यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक मुताऱ्या पाडून जागा हडप केल्याप्रकरणी लॅंड माफियांवर व त्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रजापिता सम्राट अशोक सामाजिक संघटना व भीम रत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक डी. डी. पांढरे यांनी २६ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू होते. मनपा उप-आयुक्त मच्छिंद्र घोलप यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी, आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती उपोषणकर्ते डी. डी. पांढरे यांनी दिली.
सोलापूर शहरातील मुख्य चौकात मनपाने बांधलेल्या सार्वजनिक मुताऱ्या लँड माफिया व त्यांना साथ देणारे झोन अधिकारी, अधिकारी यांच्या संगनमत करून अनेक सार्वजनिक मुताऱ्या पाडून सरकारी जागा हडपण्यात आल्या. त्या संबंधित अधिकारी व लॅंड माफियांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने गेल्या १० दिवसापासून आंदोलन सुरू होते.
सोलापूर शहरातील मेन मेन चौकातील ज्या मुताऱ्या पाडून टाकल्या आहेत. अशा ठिकाणी ताबडतोब (लघुंशखा) मुताऱ्या पुन्हा बांधण्यात येतील, असे आश्वासन मनपा उप आयुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिल्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
येत्या ०८ दिवसाच्या मुदतीनंतर त्यास मूर्त स्वरूप न आल्यास आम्ही पुन्हा बेमुदत धरणे आंदोलन करू. यापुढील आंदोलन महानगरपालिका प्रवेशद्वारावर करण्यात येईल असा इशाराही संस्थापक डी. डी. पांढरे यांनी दिला.