बेपत्ता १३४ महिला व त्यांच्यासोबत हरविलेल्या ०७ बालकांचा शोध घेण्यात 'मुस्कान-१२ ' ला यश
सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत, ऑपरेशन मुस्कान - १२ मोहिमेतंर्गत १८ वर्षावरील बेपत्ता महिलांची विशेष शोध मोहिम राबविण्यात आली. त्यात १३४ बेपत्ता महिला व त्यांचे सोबत हरविलेले ०७ बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कायदेशीर पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी ऑपरेशन मुस्कान-१२ मोहिमेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.
सोलापूर शहरात वेगवेगळ्या कारणावरून महिला, तरुणी अन् अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे व पोलीस निरीक्षक महादेव राऊत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली ०७ पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन मुस्कान दरम्यान ०८ तपास पथके तयार करून ०१ ते ३० नोव्हेंबर २०२३ रोजी दरम्यान या पथकाकडून दाखल भादंवि कलम ३६३ गुन्ह्यातील एकूण ०६ बालकांचा शोध घेण्यात आला.
विशेष बाल पोलीस पथकाने "ऑपरेशन मुस्कान मोहीम अंतर्गत सोलापूर शहरातून बेपत्ता झालेल्या १३४ महिला व १३ बालकांचा शोध लावला. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडून दि. १७ नोव्हेंबर रोजी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,६ भा.द.वि सह कलम ३७० (अ) (२) प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं ७८१/२०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन पिडीत महिलेची सुटका करून दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मुस्कान ऑपरेशन १२ दरम्यान सोलापूर शहर हद्दीतील शाळेमध्ये जाऊन इयत्ता ०५ वी ते इ.१२ वी वर्गातील एकूण २,२०० विद्यार्थी व विद्यार्थीनींना बालकांच्या लैगिक अपराधासबंधी, बाल कामगार अधिनियम १९८६ नुसार व हरवलेली बालकांचा शोध भादंवि कलम ३६३ अन्वये व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "ऑपरेशन मुस्कान - १२ महाराष्ट्र" ही मोहीम यशस्वीरीत्या पुर्ण करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचं पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी अभिनंदन केलं आहे.