Type Here to Get Search Results !

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आंबेकर गजाआड गावठी पिस्टल-जीवंत राऊंड जप्त; लोणावळा पोलिसांची कामगिरी


लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांचे अधिपत्याखाली नेमलेल्या पथकाने विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणास ताब्यात घेतले. अविनाश उर्फ अवि कैलास आंबेकर (वय -२६ वर्षे, रा. देवळे, तालुका मावळ,जिल्हा पुणे) असं त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस असा ३५, ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी, २६ डिसेंबर रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना  मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार एक इसम स्वतःजवळ विनापरवाना पिस्टल घेऊन फिरत असून वरसोली येथील कचरा डेपोचे परीसरात भारत गॅस गोडाऊनजवळ येणार असल्याचे कळाले. त्यांनी याबाबत पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांना त्या बातमीचा आशय व छापा कारवाईचा प्लॅन सांगून कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले हे तात्काळ त्यांचे सोबत असणारे स्टाफसह भारत गॅस गोडावून वरसोली येथे रवाना झाले. 

तेथे एक इसम उभा असलेला दिसला. त्यास पोलीसांची चाहूल लागताच, तो तेथून पळून जावू लागला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या पथकाने अतिशय कुशल रितीने त्याचा पाठलाग करुन त्यास काही क्षणातच त्याब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत त्याचे ताब्यातून गावठी बनावटीचे एक पिस्टल व एक जीवंत राऊंड असा एकूण ३५, ५०० रुपयांचा माल हस्तगत करुन जप्त आला. याप्रकरणी बाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहा. पोलीस अधीक्षक (लोणावळा विभाग) सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार विजयकुमार मुंढे, पोलीस हवालदार नितीन कदम, पोलीस हवालदार संतोष शेळके, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक भुषण कदम, पोलीस नाईक किशोर पवार, पोलीस अंमलदार संजयदादा पंडीत, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे, पोलीस अंमलदार ऋषीकेश पंचरास यांनी सहभाग घेतला होता.