सोलापूर : सोलापूर शहरात दुचाकी चोरी ही नित्याचीच बाब बनलीय. आता अशा वाहन चोरट्यांचा धाडस वाढल्याचे दिसून आलं आहे. अज्ञात चोरट्याने कॉलेज जवळ पार्क केलेली सुमारे दहा लाख रुपये किंमतीची एर्टिगा कार चोरून नेलीय. ही घटना विजापूर रस्त्यावरील ए. जी. पाटील कॉलेजजवळ बुधवारी सकाळ पूर्वी घडलीय. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ए. जी. पाटील कॉलेज रस्त्यावर सैपन नदाफ यांच्या गॅरेज जवळ मंगळवारी सायंकाळी पार्क केलेली के ए २६ / एन २४८७ क्रमांकाची एर्टिगा कार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी रमजान सिकंदर मकानदार (वय-२४ वर्षे, रा. हिरेबन वनेवाड,तालुका इंडी) यांनी फिर्याद दाखल केली.
त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात १० लाख रुपये किंमतीची कार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.