" विषारी ते वेद, अज्ञाना डसती
बिळात पळती, सर्पावत"
हा म. फुले ह्या महाकवीचा, मराठी आधुनिक कवितेच्या जनकाच्या 'अखंड ' आहे. हि रचना अभंगासारखी वाटत असली तरी हा अभंग नाही. भक्तीचे स्तोम माजवून बहुजनांना वेडे करण्याचा म. फुलेंचा दुष्ट विचार नव्हता. त्यांनी जाणीवपूर्वक आपण सामाजिक आशयाची कविता (अखंड) लिहीत आहोत, हे दाखवून दिले. आकाशातील कवितेला म. फुलेंनी जमिनीवर आणले. त्यांनी माणसांची, माणसांसाठी व माणुसकीची प्रथम कविता मराठीत लिहिली. मराठी कवितेला आशय व अभिव्यक्तीच्या दोन्ही अंगाने आधुनिक साज चढविला. वरील त्यांचा एकाच 'अखंड ' स्पष्टीकरणासाठी पुरेसा आहे.
महात्मा फुलेंनी वेद संस्कृतीवर प्रखर हल्ले चढविले. ब्राम्हण वर्गाने ज्या वेदांना पूजनीय मानले, वेदांच्या आधारे चातुर्वर्णव्यवस्था प्रस्थापित केली त्या वेदांनाच म. फुले यांनी केवळ नाकारले नाही तर त्यांना विषारी सर्पाची उपमा दिली. वेदांमध्ये जातीयतेचे, विषमतेचे विष भरलेले आहे. ब्राम्हण वर्ग ज्या वेदांचे भांडवल करून हजारो वर्षे देशातील बहुजनांवर राज्य करीत होता, त्या त्यांच्या जगण्याच्या भांडवलालाच म. फुलेंनी विषारी साप म्हणावे, यालाच क्रांती म्हणतात.
म. फुल्यांनी १९ व्या शतकात येथील विषारी व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले होते. येथील ब्राम्हणांनी धर्माचा दुरुपयोग केला, धंदा केला व बहुजनांना गुलाम करून वागविले म्हणून त्यांनी ब्राम्हणांवर जहरी टीका केली. तशी ती करणे काळाची गरज होती.कोणी तरी हे करणे गरजेचे होते. फुल्यांनी तो धीटपणा दाखविला, म्हणून फुले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.
सन १८१८ साली पेशवाई बुडाली. पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकला. पेशवाई बुडाली, याचे दुःख महाराष्ट्रातील ब्राम्हणांना होणे स्वाभाविक होते. पण पुरा महाराष्ट्र आनंदित झाला होता. ब्रिटिशांची गुलामगिरी सुरु झाल्याने महाराष्ट्र आनंदित झाला नव्हता तर पेशव्यांच्या अमानुष गुलामगिरीतून मुक्तता झाली म्हणून महाराष्ट्राने आनंदोत्सव साजरा केला होता. तरीही धार्मिक-सांस्कृतिक गुलामीत महाराष्ट्र अडकूनच पडलेला होता. अशा काळात म्हणजे पेशवाईचा अंत झाल्यानंतर सन १८२७ मध्ये म. फुले ह्या युगपुरुषाचा जन्म झाला.
महाराष्ट्रात धर्म सत्तेचा प्रभाव जीवनातील सर्वच क्षेत्रावर पडलेला होता. त्या धर्माची उपनाम पहा...
०१) पत्नी धर्म
०२) सेवक धर्म
०३) राज धर्म
०४) कुल धर्म
०५) वर्ण धर्म
०६) व्यवसाय धर्म
०१) पत्नी धर्म : महिला हि गुलामच होती. मनुस्मृतीने तिला पुरुषांच्या तुरुंगात कैद करून ठेवलेले. पत्नीने नवऱ्याची मरेपर्यंत सेवा करायची, हा पत्नीधर्म अस्तित्वात होता. तिने नवऱ्याला पतीदेव म्हणायचे. येथील ब्राम्हण संस्कृतीने स्त्रीला कायमची गुलाम केले होते.
म. फुलेंनी प्रचलित धर्माचा अर्थच बदलून टाकला. हीच क्रांती होती. स्त्रीला पुरुषांइतकेच स्थान असले पाहिजे, हा स्त्री -पुरुष समानतेचा सिद्धांत महाराष्ट्र प्रथम फुल्यांनी मांडला. महाराष्ट्रात बोलके सुधाकर खूप झाले. ते सर्वच ब्राम्हण वर्गातले होते. ब्राम्हण समाज सुधारकांची समाज-सुधारणा आपल्या घराबाहेर असायची, घरात नसायची. समाजसुधारक आगरकरांची पत्नी कुठे होती? न्या. रानडेंची पत्नी कुठे होती? यांची तर कुणाला नावेही माहित नाही. परंतु म. फुलेंच्या पत्नीचे म्हणजे सावित्रीमाईंचे नाव आजही अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. म. फुलेंनी प्रथम आपल्या पत्नीलाच शिकवून स्त्री शिक्षणाचा प्रारंभ केला. सावित्रीमाई शिकल्या व शिक्षिका झाल्या. महाराष्ट्रातील आद्य शिक्षिकेचा मान त्यांनाच द्यावा लागतो. ज्या ब्राम्हण समाजातील काही महिलांची नावे सतत आज पुढे केली जातात,आम्ही विचारतो सावित्रीमाई नसत्या तर ह्या कुठे असत्या? सावित्रीमाई नसत्या तर पंडित रमाबाई, आनंदीबाई जोशी,काशीबाई कानेटकर,लक्ष्मीबाई टिळक,दुर्गा भागवत ह्या महिला निर्माणच झाल्या नसत्या. पत्नीधर्म सांभाळत चुली फुंकत राहिल्या असत्या व मुलांचे लेंढार सांभाळत राहिल्या असत्या.
०२) सेवक धर्म : आपल्याशिवाय सर्वच जातीचे लोक आपले सेवक आहेत, त्यांनी आपली सेवा केली पाहिजे, असे दंडक धर्मग्रंथात ब्राम्हणांनी लिहून ठेऊन 'सेवक धर्म' बहुजनांवर लादला. क्षत्रियांना त्यांनी आपले रक्षण करण्यास सांगितले तो त्यांचा ' सेवक-धर्म' वैश्यांना व्यापार करायला लावून आपली मिरचीची (संसाराची) सोय ब्राम्हणांनी करून ठेवली क्षत्रिय राजांना सुद्धा आपल्या सेवेची ब्राह्मणांविषयी कर्तव्ये लिहून ठेवली आणि ८५ टक्के बहुजन समाजाला शूद्र अतिशूद्रांच्या यादीत टाकून त्यांना तर गुलामच केले. म. फुलेंनी हे 'ब्राम्हणांचे कसब' ओळखले. व ह्याच नावाचा ग्रंथ लिहून जगासमोर ठेवला. ब्राम्हणांचा ' सेवक धर्म' नाकारण्याचे बहुजनांना म. फुल्यांनी जाहीर आवाहनच केले.
०३) राजधर्म : राजाने राजा म्हणून राज्य करताना स्वबुद्धीने राज्यकारभार करू नये. धर्म ग्रंथात म्हटले आहे त्याच पद्धतीने राजाने राज्यकारभार करावा, हे सर्व दंडक हुशार ब्राम्हणांनी धर्मग्रंथात लिहून ठेवून राजांनाही गुलाम केले. महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या धर्मसत्तेचा अंमल जो हजारो वर्षे चालू होता, तो प्रथम फुलेंच्या लक्ष्यात आला आणि त्यांनी धर्मसत्तेविरुद्ध युद्धच पुकारले. म. फुलेंनी देव-भक्त यांच्या मधील ब्राम्हण नामक दलाल नाकारला. हि फार मोठी क्रांती होती, फुल्यांची क्रांती आजही बहुजन वर्गाला अजिबात कळली नाही. आजही बहुजन वर्गाचे ब्राह्मणांशिवाय पान हलत नाही. प्रत्येक धार्मिक विधीसाठी त्यांना ब्राह्मणच लागतो. देवळांतील पुजारी, सत्य नारायणाची पूजा करणारा भटजी, लग्न लावणारा भटजी हाच खरा दलाल असल्याचे म. फुले उघडपणे सांगायचे व ह्या दलालांना दूर ठेवा, असेहि बेधडकपणे बोलायचे, लिहायचे . धर्माच्या ठेकेदारांचा ठेकाच त्यांनी नाकारला. हीच त्यांची क्रांती होती.
म. फुल्यांनी कधीही देवाला देव म्हटले नाही. त्यांनी विश्ववनिर्मात्या निसर्गाला 'निर्मिक' म्हटले. ' निर्मिक' हा शब्द खूप जाणीवपूर्वक त्यांनी निर्माण केलं . परंतु ब्राम्हणांनी येथील ९० टक्के लोकांच्या डोक्यात ३३ कोटी देव इतके फिट करून ठेवलेत कि, ते कधीच डोक्याबाहेर जाणारच नाहीत. क्रांतिकारांचा पराभव करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देव संकल्पना येथील लोकांच्या मनाच्या पाटीवरून पुसलीच जाणार नाही. हिंदू धर्म सत्तेचा अंमल अबाधित आहे. दररोज एक मंदिर भारतात बांधले जाते. मंदिरे हि ब्राह्मणांची पैसे कमविण्याची बाजारपेठ आहे. धंदा तेजीत आहे. संत रामदासांनी महाराष्ट्रात मंदिरे बांधण्याची मोहीम सुरु केली. आध्यात्माचा धंदा खरा तर त्यांनीच तेजीत आणला. ह्या धार्मिक बाजारपेठेचा पहिला व्यापारी रामदासच होते. त्यांना पक्के माहित असावे कि, येथे धर्मवेडे लोकच जास्त आहेत, तेच आपले गिऱ्हाईक आहेत.
त्यांनी श्लोक रचले. त्यातून समाजाला सज्ञान करण्याऐवजी अज्ञानीच ठेवले, ते म्हणायचे ' जागी सर्व सुखी असा कोण आहे' ?
आजही लोकांना हा प्रश्न खरा वाटतो. म. फुलेंचा यावर आक्षेप होता. ते म्हणत असत कि, जगात कोणी सुखी नाही असा जगाविषयी, जीवनाविषयी तुच्छतेचा व नकारात्मक भाव रामदासांनी सांगून बहुजनांची बौद्धिक फसवणूक केली. जगात कोणीच सुखी नाही, असे सांगताना रामदासांना असेही सांगायचे आहे कि, जगात सर्वच दुखी आहेत, तुम्ही दुःखातच रहा . म. फुलेंनी रामदासांचा सुखाचा चुकीचा सिद्धांतच नाकारला. हि त्यांची क्रांती होती. पण त्यांच्या क्रांतीचा अर्थ आजही बहुजनांना कळला नाही.
फुल्यांना लोक विसरले रामदास घराघरात जिवंत आहेत. कोणी धर्माधिकारी नावाच्या माणसाने बैठका नावाचा प्रकार सुरु केला. अवघा महाराष्ट्र वेडा झालाय. लोक कामधाम टाकून बैठकांना जातात. त्याबैठकीत रामदास शिकविला जातो. रामदास अवतारी पुरुष होता. असे बिंबविले जाते. रामदासाचा दासबोध घराघरात हळद अबीर -गुलाल फुलांनी पूजाला जातो. ब्राम्हणांचा अध्यात्मिक धंदा आजही जोरात चालू आहे. येथे क्रांतिकारक म. फुले वेडे ठरले. कोणालाच म. फुले नको आहेत. आज ज्यांना म. फुले जिवंत ठेवायचे असेल त्यांनी घराघरात म. फुलेंचा 'ब्राम्हणांचे कसब'
ग्रंथ ठेवावा. त्यांचे पारायण करावे. रामदासांचे श्लोक म्हणण्याऐवजी म. फुलेंचे 'अखंड' वाचावेत. ते अखंड खंड न पाडता वाचावेत. म. फुलेंचे 'तृतीय रत्न' नाटक रंगभूमीवर आणा. ते नाटक बहुजन वर्गातील प्रत्येक स्त्री-पुरुषांनी पाहावे. पुन्हा पुन्हा पाहावे. फुलेंची विचारांची फुलबाग फुलवा, इतकीच आपण सर्वांना प्रार्थना.
- शिवश्री मुजफ्फरभाई सय्यद
अध्यक्ष- छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच,
भ्रमणध्वनी- ९९६०३२५०५७