उत्तर सोलापूर तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान
सोलापूर : राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल अन् हतबल झाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे हाल सुरू असताना सरकार मात्र केवळ आणि केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नेमणूक पत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते प्रकाश वानकर यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर बोलत होते .
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांसह सर्वच प्रश्नांसाठी लढणारी एकमेव शिवसेना आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आता रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असं शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यावेळी बोलताना म्हटले.
आपण पूर्वीपासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सामान्य कार्यकर्ता आहे, परंतु मधल्या काळात काही कारणाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला होता. तेथे आपले मन रमले नाही, म्हणून आपण शिवसेनेत प्रवेश करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण केलेल्या कामाची पावती म्हणून आपल्याला शेतकरी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख हे पद मिळाले आहे. या पदाचा शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक वापर करणार असल्याचे शेतकरी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख नसीर शेख यांनी यावेळी म्हटले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली असून निश्चितच हे नवीन पदाधिकारी आपापल्या पदाला न्याय देतील ,असे मत उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेचे प्रमुख संजय पौळ यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख लहू गायकवाड, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रसाद निळ, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजिंक्यराणा देशमुख, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख परिणीता शिंदे, उपतालुका प्रमुख अच्युतराव भाबळे, सदाशिव सलगर, सचिन घोडके, अरुण लोंढे यांच्यासह विभाग प्रमुख लक्ष्मण मुळे, शाखाप्रमुख प्रमोद गवळी, ग्रामपंचायतचे सदस्य अभिमान गवळी, रामचंद्र मुळे, रमेश टोणपे आदी मान्यवर उपस्थित होते.