सोलापूर : संशयित वाहनास हाताच्या इशाऱ्याने बाजूस थांबविण्यास सांगत असताना चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर वाहन पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर घालून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार सोलापुरात तालुका पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर शनिवारी, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी घडला. त्या वाहनात अनेक गायी आढळल्या असून सदर बझार पोलीस ठाण्यात एका कुरेशासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.कॉ. विठ्ठल चिदानंद काळजे आणि अन्य कर्मचारी गुरुनानक नगर चौकात कर्तव्य बजावत असताना, त्यांना एम एच ११/एम ४७८९ क्रमांकाच्या आयशर टेंपोत क्रूरतेने बांधून ०८ गायी अन् खोंड नेले जात असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी टेंपो थांबविण्यास इशारा केला असता, थांबण्याऐवजी पळून जाण्याच्या उद्देशाने पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला.
टेंपो चालकाने त्याचे वाहन थांबविण्याऐवजी वाहनासह पलायन करण्याच्या उद्देशाने लोकसेवकाचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्यासाठी सदरचे टेम्पो शासकीय वाहन पीसीआर २ मोबाईल क्रं. एम एच १३ टीडी/७१०२ या शासकीय वाहनाचे पाठीमागील बाजूस धडक देवून वाहनाचे पाठीमागील इंडिकेटर तसेच दरवाजा तुटुन शासकीय वाहनाचे आर्थिक नुकसान केले. त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
टेंपो चालक समीर कय्युम कुरेशी, त्याचे ताब्यातील वाहनामध्ये तिघांनी मिळून सुमारे ३ लाख रुपये किमतीची गोवंशीय जनावरे अत्यंत क्रुरतेने, निर्दयतेने, त्यांचा जिव गुदमरेल अशा पध्दतीने दोरीने बांधून त्यांची कत्तल करणेकामी शास्त्री नगर येथे घेऊन जात असताना दिसून आले, त्यातून हा थरारक प्रकार घडला.
या प्रकरणी पोकॉ विठ्ठल चिदानंद काळजे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार समीर कय्युम कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, सोलापूर), किरण बनसोडे, च जगे (रा. भिम नगर, सांगोला) यांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्या ताब्यातून ५ खिलार गायी, १ खिलार खोंड आणि २ पांढऱ्या जर्सी गायी आणि टेंपो असा एकूण ०७ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सपोनि अंकोलीकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.