सोलापूर/०५ नोव्हेंबर : सोलापूरचे सुपुत्र डॉ.अभिजित वाघचवरे यांनी मुंबईतील अरबी समुद्रात ०५ किलोमिटरची स्विमॅथॉन स्पर्धा अवघ्या ०३ तास ३० मिनिटात पूर्ण करून यश मिळवले. मुंबई विरार येथील कळंब राजोडी बीच येथील समुद्राच्या खार्या पाण्यात पॉवर पीक्स या संस्थेने ही स्पर्धा रविवारी, ०५ नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत देशभरातील ४०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
०५ किलोमिटरच्या पोहण्याच्या या स्पर्धेला सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी प्रारंभ झाला. समुद्रातील खारे पाणी, उसळत्या लाटा आणि न थांबता पोहणे अशा आव्हानाला तोंड देत डॉ. अभिजित वाघचवरे यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. रनिंगमध्ये ज्या प्रमाणे लांब पल्याच्या मॅरेथॉनला आपण अल्ट्रा मॅरेथॉन म्हटलं जातं, त्याप्रमाणे समुद्रातील या पोहण्याच्या स्पर्धेला अल्ट्रा स्विमॅथॉन असे म्हणतात.
या स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या एक वर्षापासून केएलई शाळेच्या आवारातील जलतरण तलावात सराव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अशा स्विमॅथॉन स्पर्धा पूर्ण केल्याचा अनुभव असल्यास आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्यासाठी लाभ मिळतो. डॉ. वाघचवरे यांनी स्वतःचे हॉस्पिटल सांभाळून अनेकांना आपले आरोग्य सृदृढ कसे ठेवावे, यासाठी मार्गदर्शन केलं आहे.
नुकत्याच झालेल्या नवरात्र उत्सावात डॉ.सत्यजित वाघचवरे आणि डॉ. अभिजित वाघचवरे या दोघां बंधुंनी सोलापूर ते तुळजापूर हे ४२ किलोमिटरचे अंतर धावत ०५ तासात पूर्ण करीत आरोग्याचा संदेश दिला होता. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी डब्लू एस स्पोर्टस अॅड इको चे त्यांचे सहकारी डॉ. राजश्री वाघचवरे, डॉ.शुभांगी वाघचवरे, नितीन जाधव आणि सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. पुढील काळात डॉ. अभिजित वाघचवरे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयर्नमॅन ही स्पर्धाही यशस्वीपणे पूर्ण करतील, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.