महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा
सोलापूर : आजच्या माहिती-तंत्रज्ञान आणि विज्ञान युगामध्ये जग चंद्रावर जात असताना आपण जर देवपूजा करत बसलो किंवा धार्मिक कर्मकांडामध्ये अडकलो तर आपली प्रगती होणार नाही. त्यासाठी महात्मा फुले यांचा विज्ञानवादी दृष्टिकोनसमोर ठेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करून संशोधक- शास्त्रज्ञ पदापर्यंत भरारी घेतली पाहिजे, असं प्रतिपादन जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, कोंडीचे संस्थापक गणेश निळ यांनी केले.
जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर, राजर्षी शाहू महाराज सेमी इंग्लिश माध्यमिक विद्यालय, आणि विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी येथे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन, मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष शिवश्री गणेश निळ आणि शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर चौथी आणि पाचवीतील विद्यार्थिनींनी अतिशय बहारदार आवाजात उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजश्री कुलकर्णी, राजर्षी शाहू महाराज सेमी इंग्लिश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना औरादे यांनी आपले विचार व्यक्त केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत शिक्षक पेशा कसा असतो, हे स्वतः अनुभवले.
यावेळी जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............. चौकट ......
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे विचार
समाजाला दिशादर्शक : प्राचार्या सुषमा निळ
" क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचे योगदान दिल्यामुळे त्यांचा स्मृतिदिन खऱ्या अर्थाने शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होणे गरजेचे आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेसाठी वेचले. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांडाविरुद्ध आवाज उठवणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे विचार समाजाला दिशादर्शक असल्याचं विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालयाच्या प्राचार्या सुषमा निळ यांनी यावेळी म्हटले.