सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू मिल कामगारांसाठी प्रहार मैदानात; उग्र आंदोलन करण्याचा दिला इशारा

shivrajya patra
सोलापूर ( प्रतिनिधी ) : लक्ष्मी-विष्णू  मिल कामगारांसोबत झालेल्या बैठकीत, 'प्रहार 'ने त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यांना प्रहार जनशक्ती च्या माध्यमातून लवकरात लवकर न्याय देण्याचं केवळ आश्वासन  देऊन न थांबंता, या कामगारांच्या पाठीशी राहून व कामगारांच्या सहकार्याने राज्य मंत्रिमंडळात आवाज उठवू, प्रसंगी भविष्यात यासाठी एक मोठे आंदोलन ही करू, अशी ग्वाही याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जमीर शेख व अजित कुलकर्णी यांनी दिली.

गेल्या २९ वर्षापासून सोलापुरातील. सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष्मी विष्णू कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी आणि त्यांच्या इतर न्याय मागण्यासाठी फक्त कामगार आणि त्यांच्या प्रतिनिधीची दिशाभूल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम केलेले आहे.

मिल कामगारांना आपल्या हक्काची जागा मिळालीच पाहिजे, कामगारांसाठी वसाहत या ठिकाणी झालीच पाहिजे तसेच कामगारांना फरक रक्कम मिळालाच पाहिजे, या मागण्यांचे गाऱ्हाणे या ठिकाणी कामगारांच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढे मांडण्यात आल्या.

सोलापूरचे सुपुत्र म्हणून तसेच एक हसरा नेता म्हणून सुशीलकुमार शिंदेंकडे पाहिले जाते, पण ते त्यांचा कार्यकाळ हसत-हसतच संपवला. सोलापूरकरांच्या पदरी फक्त अश्रू दिले. त्यांनी लक्ष्मी विष्णू कामगारांची घोर निराशाच केली. त्यांच्या कार्यकाळात हा प्रश्न मंत्रिमंडळात उपस्थित करून न्याय मागितला असता पण तसे त्यांना करता आले नाही.

नंतरच्या काळात सरकार बदलल्यानंतर आमदार रूपाने सोलापूरला तीन विकासरत्न मिळाले, ते म्हणजे प्रणिती शिंदे, सुभाष देशमुख आणि विजय देशमुख  ! या तिन्ही दिग्गजांमुळे सोलापूरचा खरा विकास व्हायला पाहिजे होता, याउलट सोलापूर दिवसेंदिवस भकास होत चाललंय. या आमदारांच्या कार्यकाळात लक्ष्मी-विष्णू कामगारांसाठी त्यांनी विधानसभेत आवाज उठवायला पाहिजे होता, पण त्यांनाही तसे करता आले नाही अथवा  करावं असं त्यांना वाटले नाही.

'ताई ' म्हणून ओळखल्या जात असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी तरी कामगारांचा हा प्रश्न व्यवस्थित हाताळून कामगारांना न्याय मिळवून देतील,असे देशोधडीला लागलेल्या कामगारांना वाटले होते, पण त्यांच्याकडूनही  कामगारांच्या पदरी घोर निराशाच आली. सोलापुरातील कामगारांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ नेतृत्व म्हणून माजी आमदार नर्सरी आडम यांच्याकडे पाहिले जाते. 

त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठे गृहप्रकल्प सोलापुरात निर्माण केले आणि घरांपासून वंचित असलेल्या गरीब कामगारांना घरे मिळवून दिली. अनेक सभा आंदोलने ते कामगारांसाठी नेहमीच करतात, मात्र ते कधी लक्ष्मी-विष्णू मिल कामगारांसाठी त्यांच्या घरांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी कधी झगडलेत का ? असा प्रश्न कामगारांना पडतोय. 

आता निवडणुका जवळ आल्यात, हे पाहून प्रत्येक पक्षातील नेता, आमदार, खासदार, आता कामाला लागले आहेत. सोलापूराच्या विकासाच्या गोष्टी करीत आहेत. नागरिकांच्या सोयी-सुविधाबाबत बोलत आहेत, पण त्यांना या लक्ष्मी-विष्णू मिल कामगारांच्या समस्या लक्षात नसतील, प्रत्येक नेता आम्ही किती प्रामाणिक आहे, आमचा पक्ष किती श्रेष्ठ आहे, आम्ही आतापर्यंत काय-काय काम केलं, कशा पद्धतीने केलं हे सांगून सर्वसामान्य नागरिकांची व सोलापूरकरांची दिशाभूल करत आहेत, असं लक्ष्मीची अनेक कामगारांनी आपल्या भावनांना वाट मोहोळ करून देताना म्हटले.
 
त्यावर, यापुढे प्रहार जनशक्ती पक्ष गप्प बसणार नाही, गरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आमदार बच्चू भाऊ कडूंच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी-विष्णू मिलच्या कामगारांचे प्रश्न राज्य मंत्रिमंडळात मांडून कामगारांचे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावू, तसेच कामगारांच्या हक्कासाठी त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रसंगी मोठे आंदोलन करण्यासही प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या समवेत असेल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे जमीर शेख यांनी म्हटले.

याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख यांनी आपल्या भाषणात, लक्ष्मी विष्णू कामगारांविषयी आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या मुद्द्याचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली, त्या सर्वांचा समाचार घेतला. येत्या बुधवारी पुन्हा बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. तर येत्या बुधवारच्या मिटींगला सर्व कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
To Top