Type Here to Get Search Results !

मत फसना इनकी सियासी दांव-पेंचो में दोस्त, तेरा-मेरा सुकूनसे जिना इनसे देखा नही जाता..



ओबीसी आणि मराठे एकमेकांविरुद्ध असे भांडत आहेत, जसे ओबीसींचे आरक्षण मराठ्यांमुळे थांबले आणि मराठ्यांचे ओबीसींमुळे..  सरकार नावाचा घटकच या वादातून गायब झाला आहे. मित्रांनो, आपला लढा सरकारविरोधात आहे, एकमेकांविरोधात नाही.. त्यामुळे सरकारवर दबाव आणा, एकमेकांवर नाही..

दोघेही एकमेकांना आरक्षण देऊ शकत नाहीत आणि एकमेकांचे आरक्षण थांबवू सुद्धा शकत नाहीत, त्यामुळे राज्यकर्त्यांच्या खेळीला बळी पडू नका.. नेत्यांच्या वक्तव्यांना भुलू नका..  परस्परांबद्दल द्वेष पसरेल अशी वक्तव्ये टाळा..  आधीच्या सरकारात ओबीसींना राजकीय आरक्षण होतं, आता ते नाही यावर कोणतेच ओबीसी बोलत नाहीत आणि मराठ्यांना आरक्षण सरकार देऊ शकते ओबीसी नेते नाही हे लक्षात का येत नाही? मराठ्यांना आरक्षण दिलं असं म्हणून ते कोर्टात टिकवू न शकलेलं सरकार दोषी की ओबीसी दोषी? लोकसुद्धा नेत्यांची वक्तव्ये ऐकून एकमेकांविरोधातच वक्तव्ये करत आहेत.

आधी यांनी हिंदू-मुस्लिम वादाने देशातील वातावरण गढूळ केलंय, मग प्रादेशिक वाद आणून राज्यराज्यात वाद लावून दिला, दिल्लीत महिला पहेलवान आंदोलन करत असताना सुद्धा त्या सगळ्या फक्त हरियाणाच्या आहेत असा प्रचार शासनाने केला, ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्यात जणू पाकिस्तान सरकारचे शासन आहे अशाप्रकारे प्रचार केला जातो.. धनगर-आदिवासी आरक्षणाचा वाद त्याचाच एक प्रकार आहे.. त्यात मराठा-ओबीसी वाद वाढवून आणखी आपसातले वातावरण गढूळ करू नका.. त्याने आपलेच जगणे कठीण होणार आहे आणि त्रास फक्त दोघांनाच होणार आहे.. त्यांनी अशी सभा घेतली आम्ही त्यांच्या नाकावर टिच्चून त्यापेक्षा मोठी सभा घेऊ यात आपली/आपल्या समाजाची ऊर्जा, पैसा, वेळ वाया गमावतोय आपण.. जे करायचं आहे ते सरकार विरोधात करा.

आपल्याला एकमेकांसोबतच जगायचं-मरायचं आहे, ह्या वादाने दोन्ही गटाचे मोठे नुकसान होईल, हाती काहीच लागणार नाही, त्यामुळे आपली लढाई सरकार विरोधात आहे, एकमेकांविरोधात नाही, हे लक्षात घेऊन वाटचाल केली तर काही हाती लागण्याची शक्यता आहे.. नाहीतर मराठा मतदार ओबीसी नेत्यांना पाडायच्या मागे लागतील, ओबीसी मतदार मराठा नेत्यांना पाडायच्या मागे लागतील.. या दोघांच्या पलीकडे भाजप नावाचा जो पक्ष आहे या भाजपा मधील मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम नेते-कार्यकर्ते यांना कुण्याचं जातीचं-समाजाचं काही घेणं-देणं नाही, स्वतःच्या ही समाजाचं नाही.. हे लोक जातीसाठी माती खाणारे नाहीत तर पक्ष आणि नेत्यांसाठी माती खाणारे आहेत. त्यामुळे जर आपल्या समाजाचं-देशाचं नुकसान होत असेल तरीही त्यांना ते मान्य असतं.. आपल्या भांडणामुळे असे लोक निवडून येतील, हे समजून घ्या.. विधानसभा -लोकसभेसाठीचे भाजपचे अंतर्गत रिपोर्ट अत्यंत निगेटिव्ह आहेत, त्यांच्याकडे  निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कोणतेच मुद्दे नाहीत, त्यांना आयते मुद्दे देऊ नका..

मराठा आणि ओबीसी दोन्हीकडील नागरिकांना (नेत्यांना नाही) हात जोडून विनंती आहे की, सारासार विचार करा, नेत्यांच्या चिथावणीला बळी पडू नका, एकमेकांमधील वाद वाढेल, अशी वक्तव्ये-पोस्ट करू नका.. सरकारकडे मागण्या करत राहा.. एकमेकांची उणीदुणी काढत राहिल्याने दोन्ही गटाचे सारखेच नुकसान होत आहे, एकमेकांना प्रश्न विचारून आपण सरकारचे काम सोपे करतोय हे लक्षात घ्या.. हे दोन्ही गट एकत्रितरित्या या राज्याचे राजकीय चित्र बदलू शकतात ही ताकद पण लक्षात घ्या.. या ताकदीचे कुणाला विभाजन करायचे आहे हेसुद्धा लक्षात घ्या..

यावर काहीच लिहिणार नव्हतो पण हे लोण आता अकोला जिल्ह्यात येऊन पोचलंय, आमच्या घरापर्यंत येऊन पोचलंय, गावातले एकमेकांना रोज रामराम करणारे, ओळखीचे, जवळचे मित्र या विषयाला घेऊन आमच्या जातीच्या नेत्याविरुद्ध पोस्ट केली म्हणून भांडत आहेत, वैयक्तिक घेत आहेत, आपापल्या समाजाच्या सोबत मी कसा ठामपणे उभाय हे दाखविण्याची शर्यत लागलीये आणि या वादातून राज्यकर्ते, शासन अलगद निसटून वरून आपली मजा बघतेय हे सहन होत नाही म्हणून हा लेखनप्रपंच..  

शेवटी आपणच आपसातील सौहार्दाच्या कबरी खोदतोय.. राज्यकर्त्यांना त्या कबरींवर सत्तेचे इमले उभे करता यावेत म्हणून.. 

- चंद्रकांत झटाले,अकोला.

7769886666