सोलापूर : सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर ऊळेगांव येथील पुलावर एस.टी. बसला अपघात होऊन पलटी झाली. ही दुर्घटना रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी पहाटे पाऊणे पाच वा. च्या सुमारास घडलीय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन जखमींना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढून उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय इस्पितळाकडे पाठवून दिले. या अपघाताला निमंत्रण देणारा अरुंद पूल कारणीभूत असावा, असे दिसून येते.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एम एच ०६ / एस ८७२९ क्रमांकाची बस सोलापूरहून भोकर निघाली होती. सोलापूर बस स्थानकावरून सुटलेल्या एसटी बसला अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील ऊळेगांव येथील अरुंद पूलावर अपघात झाला. एस.टी. बस पूलाच्या कठड्याला घासून पाठीमागील दोन्ही चाकं निखळून बस पलटी झाली.
या अपघाताची माहिती मिळाल्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी दुर्घटनास्थळी येऊन घटनास्थळ आणि अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली. पाहणी पथकात आगार व्यवस्थापक जुंधळे, यंत्र अभियंता लोंढे, विभागीय वाहतूक अधिकारी पाटील होते.