सोलापूर : मराठा समाजाला ५० टक्के च्या आत टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगे परिसरात बुधवारी रात्री कॅण्डल मार्च काढून जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यात आला.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यात अनेक जिल्ह्यातून तालुका स्तरावरून तसेच गावागावातून साखळी उपोषण आमरण उपोषण आणि कॅन्डल मार्च च्या माध्यमातून पाठिंबा दिला जात आहे. सकल मराठा समाजाची मराठा आरक्षण ही एकमेव मागणी आहे.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पहिल्या टप्प्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनास प्रारंभ केल्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा अन्य मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज्य सरकारमधील लोकप्रतिनिधींनी तीस दिवसाचा अवधी मागितला होता. त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घ्यायला ४० दिवसाचा कालावधी दिला होता.
त्या कालावधीत राज्य सरकार निर्णय घेऊन अंमलबजावणी मागे राहिल्याचे निश्चित झाल्यावर संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे रणशिंग फुंकले. त्यांच्या या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी तळेहिप्परगे येथील गणेश नगर येथून बुधवारी रात्री कॅण्डल मार्च करण्यात आला. हा कॅन्डल मार्च जिजाऊ चौक, फूट रस्ता, विनायक काडादी नगर मार्गे नागनाथ मंदिराजवळ आल्यावर त्याचा समारोप झाला. या कॅन्डल मार्चमध्ये मराठा समाजातील तरुणाई बरोबरच महिला आणि आबाल-वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.