सोलापूर : समाजसेवक जयनारायण भुतडा यांच्या दातृत्वातून आणि वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून पॉलिटेक्निक महाविद्यालयात संगणक शास्त्र पदविकेचे शिक्षण घेण्याऱ्या शेतमजुराच्या मुलीला १० हजाराची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली. वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून आतापर्यंत १०१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीय.
काव्यश्री असं तिचे नाव असून ती अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी आहे. तिचे वडील शेतमजूर आहेत. त्यांना ३ मुली व १ मुलगा आहे. घरखर्च आणि ४ मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च भागवताना त्यांना प्रचंड आर्थिक अडचणी येत आहेत. त्यात ते नुकतेच आजारपणातून बरे झाले. त्याचाही मोठा खर्च झाला.
काव्यश्री ही श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज येथे संगणक शास्त्र पदविकेच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले आहे. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अद्यापही तिची २२ हजार रुपये फी भरणे बाकी आहे, ती फी भरणे तिला जमत नव्हते. तिने तिची आपबिती वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांना सांगितली.
बुरकुले यांनी समाजसेवक व उद्योगपती जयनारायण भुतडा यांच्याशी संपर्क साधला. काव्यश्रीची अडचण त्यांना सांगितली. त्यांनी लागलीच त्या विद्यार्थिनीस घरी घेऊन येण्यास सांगितले आणि १० हजारांचा चेक तिच्या हाती सुपूर्द केला. गतवर्षीही श्री भुतडा यांनी काव्यश्रीला ०८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली होती.
वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून आतापर्यंत काशी पीठ, विविध संस्था, प्रतिष्ठान, दानशूर व्यक्ती आणि वीरशैव व्हिजन सदस्यांच्या वर्गणीच्या माध्यमातून १०१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आली आहे. याप्रसंगी भारती विनोद भुतडा, प्राची प्रवीण भुतडा, जतीन भुतडा, सामाजिक कार्यकर्ते शरद गुुमटे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, मन्मथ डोंगे शिवानंद येरटे उपस्थित होते.
फोटो ओळी : काव्यश्री फुलारीला शिष्यवृत्ती देताना समाजसेवक जयनारायण भुतडा, जतीन भुतडा, भारती भुतडा, प्राची भुतडा, शरद गुमटे, राजशेखर बुरकुले, सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, मन्मथ डोंगे उपस्थित होते.
.... . .........................चौकट ..... .......
दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेणे आवश्यक
समाजात अनेक हुशार विद्यार्थी आहेत. मात्र त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे आणि पर्यायाने समाजाचे नुकसान होते. जयनारायण भुतडा यांच्यासारखे दानशूर व्यक्ती आणि वीरशैव व्हिजन त्यांच्या पाठीमागे उभे राहतात. त्यामुळे ते विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभारतात. त्याद्वारे स्वतःबरोबर कुटुंबाला देखील सक्षम बनवू शकतात. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
शरद गुमटे, सामाजिक कार्यकर्ता.