सोलापूर/०२ नोव्हेंबर : पंचक्रोशीचा अभिमान तथा गांवचे शहीद सुपुत्र, १९ मराठा लाईट इन्फंट्रीचे लान्स नायक शिवराम विश्वनाथ चौगुले यांचा ३० वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पहार अर्पित करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
जम्मू-काश्मीरातील गाव बुदन, तालुका सोपोर, जिल्हा बारामुल्ला येथे,०२ नोहेंबर १९९३ रोजी अतिरेक्यांशी लढताना लान्स नायक शिवराम विश्वनाथ चौगुले यांना वीरमरण आले. त्यांच्या बलिदानाच्या स्मृती चिरकाल ग्रामस्थांच्या स्मरणात राहाव्यात व येणाऱ्या भावी पिढ्यांना त्यांच्या बलिदानातून प्रेरणा मिळावी, या भावनेतून दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी कासेगाव येथे स्मृती स्मारक उभं करण्यात आलं आहे.
या स्मृती स्मारकाला माजी ग्रामपंचायत सदस्य आपासाहेब पाटील यांच्या हस्ते वीर जवान शिवराम चौगुले यांच्या स्मारकाला व या स्मारकालगत असलेल्या ब्रिटिश कालीन स्मृतिस्मारकास पुष्पहार अर्पित करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जवान शिवराम चौगुले यांचे पुत्र प्रवीण उपाख्य हरी चौगुले, दशरथ चौगुले, रणजीत चौगुले, दिलीपराव चौगुले, रामहरी चौगुले, सुमित ननवरे, मोहन रेड्डी, सरकार पाटील, उस्मान शेख, सचिन उबाळे, हनुमंत चौगुले, सचिन गरड, संभाजी जाधव, श्रीकांत जाधव, ताजुद्दीन शेख, श्रीकांत पाटील, राजकुमार पाटील, अमोल पाटील, रघुनाथ चौगुले, फिरोज तांबोळी, प्रकाश पांगरकर, अमोल गरड, अण्णा माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीर गाथा
दिनांक ०२ नोहेंबर ९३ रोजी काश्मीर मधील गाव बुदन, तालुका सोपोर जिल्हा बारामुल्ला मध्ये एका अतिरेक्याजवळ हत्यारे आहेत, अशी बातमी लागल्यावर १९ मराठा लाईट इन्फंट्रीच्या अल्फा कंपनीच्या नंबर एक प्लाटूनला धाड घालून ती हत्यारे जप्त करण्याचा आदेश मिळाला. ही टोळी वाटरगांव कॅम्पमधून संध्याकाळी सात वाजता रवाना झाली, तिच्या मध्ये नं. २७७९१३० लान्स नायक शिवराम विश्वनाथ चौगुले हे आघाडीला होते.
एक रायफल व बराचसा दारुगोळा जप्त करून परत येत असताना, गावाच्या कडेला असलेल्या घरातून काश्मीरी उग्रवाद्यांनी या तुकडीवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. तेव्हा ला. नायक शिवराम चौगुले व या टोळीला जवानांनी जबरदस्त गोळीबार करून प्रत्युत्तर दिले व कोंडीत पकडले. हे पाहून अतिरेक्यांची तारांबळ उडाली व ते अंधाधुंद गोळीबार करत पळू लागले. शिवरामने एका पळून जाणाऱ्या अतिरेक्याला आपल्या अचूक नेमबाजीने जागच्या जागी ठार केले व एक रायफल व बरीचशी काडतुसे हस्तगत केली. तेवढ्यात दुसरा अतिरेकी पळताना दिसल्यावर ला. नायक शिवराम चौगुले ने गोळ्यांच्या भडीमाराची व स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पाठलाग करून त्याला हत्यारासहित जिवंत पकडले. दोघांमध्ये खडाजंगी जुंपली. तगड्या शिवरामने त्या धिप्पाड अतिरेक्याला इंचभर सुध्दा हलू दिले नाही. ही खडाजंगी सुरु असताना दुसऱ्या एका अतिरेक्याने डाव साधला व शिवरामला पाठीमागून गोळीचा निशाना बनवला. प्राणघातक जखमी होऊन सुध्दा अतिरेक्याची हिसकावून घेतलेली रायफल हातातून सोडली नाही. अतिरेकी आपली रायफल सोडून पळाला, शेवटी घायाळ शिवरामने आपले प्राण सोडले.
मराठ्यांच्या खऱ्या परंपरे प्रमाणे देशाच्या रक्षणासाठी आपले बलीदान देऊन लान्स नायक शिवरामने मराठा रेजिमेन्टच्या इतिहामामध्ये एक सुवर्ण पान जोडले आहे, जे येणाऱ्या पिढीला सदा आदर्श राहील.