Type Here to Get Search Results !

भारतातील ज्योतिर्लिंग भारतीय एकतेचे संकेत : श्रीकाशी जगद्गुरू


केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

रामेश्वर : भारत देश विविध भाषा, प्रांत, संस्कृतीने युक्त आहे. या सर्वांना एक सूत्रात बांधण्याचे अनमोल कार्य अत्यंत प्राचीन काळापासून विद्यमान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून होत आहे. ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी प्रदेश, भाषा, जात, धर्म असा भेद न मानता सर्व भक्त सर्वत्र जातात. दर्शन आणि तीर्थस्नान करून आनंदाची अनुभूती घेतात. देशातील विविध प्रदेशातून लोक या ठिकाणी एकत्र येतात. सर्व प्रकारचा भेद विसरून हे लोक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. ही भारतीय संस्कृती आहे असे विचार श्रीकाशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी आपल्या आशीर्वाचनात सांगितले.

श्रीक्षेत्र रामेश्वर येथे काशीपीठाची शाखामठ आणि यात्री निवास भूमिपूजनप्रसंगी आयोजित धर्मसभेत ते बोलत होते. श्रीकाशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्रीकाशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा, आ. जगदीश गुडगुंठीमठ (जमखंडी), बागलकोट येथील श्री बसवेश्वर वीरशैव विद्यावर्धक संघाचे चेअरमन वीरण्णा चरंतीमठ उपस्थित होते.

महास्वामीजी पुढे म्हणाले कि, रामेश्वरपासून केदारपर्यंतची भारत भूमी आपल्या ऋषीमुनींची तपोभूमी आहे. संपूर्ण भारत हे एक तीर्थक्षेत्रच आहे. काशीला येणारे भक्तगण आवर्जून रामेश्वरला जातात. काशीच्या जंगमवाडी मठामध्ये येणाऱ्या सर्वधर्मीय भक्तांसाठी निवास आणि प्रसादाची सोय आहे. अशीच सोय रामेश्वर येथे येणाऱ्या सर्व भक्तांसाठी व्हावी म्हणून काशीपीठाच्या वतीने महास्वामीजींनी जमीन खरेदी करून आज भूमिपूजन समारंभ केला.

श्रीशैल आणि काशीच्या नूतन जगद्गुरूंचे आशीर्वचन झाले.
यावेळी याप्रसंगी सर्व प्रांतीय ५० हून अधिक शिवाचार्य उपस्थित होते. तसेच तमिळनाडू, केरळ, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र येथील हजारो भक्तगण उपस्थित होते.

.............. चौकट .........

पुण्यभूमीमध्ये काशी जगद्गुरू मठ आणि यात्री निवास ही अत्यंत आनंदाची गोष्ट : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन 

रामेश्वर ही रामाची तपोभूमी आहे. याच तपोभूमीमध्ये रामाला अगस्त्य मुनींकडून आदित्य हृदय स्तोत्र शिकायला मिळाले. यामुळेच रावणावर विजय प्राप्त करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले. शत्रुभाव विनाशकारक आहे. मनातील शत्रुभाव नष्ट करणारी ही तपोभूमी आहे. अशा पुण्यभूमीमध्ये काशी जगद्गुरू मठ आणि यात्री निवास निर्माण करणार आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असे आनंदोद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काढले.

फोटो ओळी : 
रामेश्वर येथे काशीपीठाच्या शाखामठ भूमिपूजनप्रसंगी श्रीकाशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल जगद्गुरु डॉ. चेन्नसिद्धराम पंडितराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्रीकाशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, के. एस. ईश्वरप्पा, आ. जगदीश गुडगुंठीमठ, वीरण्णा चरंतीमठ छायाचित्र दिसत आहेत.