सोलापूर : 'भूकंप' हा शब्द आठवला, तरी मराठवाड्यात ३० वर्षापूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या स्मृति जाग्या होतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव परिसरात सोमवारी दुपारी २ वा. च्या सुमारास काही क्षणाचा धरणीकंप जाणवला. हा सौम्य स्वरूपाचा धरणीकंप होता, हा धरणीकंप भूकंप आणखी काय, याचा अधिकृतरित्या माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे झालेल्या भूकंपाकडे आज, ३० वर्षांनंतरही काळा दिवस म्हणून पाहिला जातो. त्या प्रलयकारी भूकंपात किल्लारी, माकणी सास्तूरसह आसपासच्या अनेक गावात काही मिनिटात होत्याचं नव्हते, केलं होतं. घरं-वाड्यांच्या पडझडीत त्याखाली जे गाडले गेले, संपलेच ! जे जायबंदी झाले त्यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.
ह्या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्युमुखी पडलीत, १५,८५४ जनावरे दगावली. सुमारे १६,००० लोक जखमी झाले. ५२ गावांतील ३० हजार घरे जमीनदोस्त झालीत, तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले, असे सांगण्यात येते. त्यावरून त्याची भीषणता पुढं येते.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी, कासेगांव परिसरात असलेल्या अधिकृत अन् अनधिकृत दगडखाणी व खडी क्रशर आहेत. तिथं उत्खननादरम्यान होणारे विस्फोट या परिसराला अंगवळणी पडलेले आहे. त्या स्फोटांचा आवाज येतो, सोमवारी दुपारी झालेले कंपन नागरी वस्त्याच्या रहाटगाडग्यात कोणाला फारसं जाणवलं नाही, मात्र जे शेतात वा झाडाखाली होते, त्यांना ते कंपन जाणवले.
यासंबंधी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे विचारपूस करता, राष्ट्रीय व्यवस्थापन विभागाकडून त्या संबंधीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, ती उपलब्ध झाल्यावर अधिकृतरित्या सांगता येईल, असं दक्षिण तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.