सोलापूर : कार्यालयात शासकीय काम करीत असताना त्रिकूटाने, 'तु, राहुलला का त्रास देतो' असं जाब विचारत,नरेंद्र व्यंकटेशन मुदेलेल्लु या ५५ वर्षीय कर्मचाऱ्यास मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा लॅपटॉप हिसकावून घेऊन जमिनीवर आढळून चुराडा केला. हा प्रकार डी.आर.एम. ऑफीस कॅम्पसमध्ये असलेल्या रेलटेल ऑफीसमध्ये शनिवारी दुपारी घडला. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,नरेंद्र मुदेलेल्लु (व्यवसाय-नोकरी, रा- प्लॉट नं. ६०४ पनाळा अपार्टमेंट, किल्लेदार मंगल कार्यालयजवळ, सोलापूर) कार्यालयात त्यांचे काम करीत असताना, तिथे आलेल्या राहुल उलागडे (रा.विजापूर रोड, सोलापूर) व त्याच्या सोबतच्या ०२ अनोळखी इसमांनी, वरील नमूद कारणावरून अर्वाच्छ शब्दात शिवीगाळ करीत हाताने व लाथा-बुक्क्याने मारहाण करीत नरेंद्र यांच्या टेबलावर असलेला डेल कंपनीचा लॅपटॉप त्यांनी जमीनीवर आपटून फोडून नुकसान केले.
ते एवढ्यावरच न थांबता,नरेंद्र मुदेलेल्लु यांना हात-पाय तोडून जीवे ठार मारण्याची दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक डोंगरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.