सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात एका मालवाहतूक रिक्षातून १८ हजार रुपये किंमतीची फ्रुट बिअर वाहतूक होताना जप्त केली. त्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ०७.३० वा. च्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राहुल बांगर यांचे पथकाने सोलापूर शहरातील अशोक चौक येथील वालचंद कॉलेज समोरील रोडवर सापळा लावून अल्ताफ हपिसाब सगरी (वय -३२ वर्षे) व गौस अलीशेर बागवान (वय-३१ वर्षे, दोघे रा. सरवदे नगर, मुळेगांव रोड, सोलापूर) हे मालवाहतूक रिक्षा क्र. एमएच१३/एएन४८९८ मधून युनिक ड्रिंक्स कंपनीचे फ्रुट बिअरच्या ६५० मिली क्षमतेच्या ६०० सीलबंद बाटल्या वाहतूक करताना आढळून आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळावरून १८ हजार रुपये किमतीच्या फ्रुट बियरसह एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन व्हनगुंटी व शोएब बेगमपूरे यांच्या पथकाने पार पाडली.