सोलापूर : अल्पवयीन मुलास दुचाकीवर बसवून नेऊन फायबर काठीने जबर मारहाण करीत लोखंडी सळई तापवून चटके दिले. हा प्रकार ओम शांती बिअर शॉपी समोरील मोकळ्या पटांगणात शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडला. बबलू श्रीनिवास संगा असं जखमीचं नांव आहे. याप्रकरणी गणेश आणि त्याच्या अन्य साथीदाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एमआयडीसी माळीनगर येथील रहिवासी बबलू संगा (वय -१७ वर्षे) त्याच्या मावशीच्या घरी असताना, दुचाकीवर आलेल्या गणेश आणि त्याच्या अनोळखी साथीदाराने, त्यास 'तुझ्याकडे काम आहे, चल' असं म्हणून दुचाकीवर दोघांच्या मध्ये बसवून ओम शांती बियर शॉपी बारच्या समोरील मोकळ्या मैदानात नेले.
त्या ठिकाणी गणेश, बबलू, बसू, विकास मालक आणि अनोळखी दोन इसमांनी तसेच बबलूचा नातेवाईक इरेश केंचीगुंडी यांनी संगनमताने मुलीची छेड का काढतो, असा जाब विचारून नळाच्या फायबर पाईपने सर्वांगावर मारहाण केली. त्यावर त्यांचे समाधान झाले नाही, विकास मालक म्हणून परिचित असलेल्या इसमाने लोखंडी सळई तापवून बबलूच्या डाव्या हाताच्या पंजाला आणि कमरेला चटके देऊन दुखापत केली.
ह्या प्रकरणी बबलू संगा याच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात सर्व आरोपीविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री मारहाण आणि अपहरणासह भादंविसंच्या अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.