'वाडकर विरुद्ध वाडकर' लक्षवेधी लढतीत दोन्ही पॅनलकडून आता मतदारांच्या वैयक्तिक भेटीवर दिला जातोय जोर

shivrajya patra
कासेगांव : सोलापूर जिल्ह्याच्या अन् दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेलं गांव अशी कासेगांवची ओळख आहे. या गांवाची सार्वत्रिक निवडणूक लागली असून शुक्रवारी, प्रचार संपला. रविवारी मतदार आपला मताधिकार बजावतील. प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही पॅनलकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. खुला प्रचार संपताना, 'वाडकर विरुद्ध वाडकर' लक्षवेधी लढतीत दोन्ही पॅनलकडून मतदारांच्या वैयक्तिक भेटीवर जोर दिला जात असून जनमताचा कौल, सोमवारी दिसून येईल.
या निवडणूक रणधुमाळीत गावातील परंपरागत राजकीय मित्र आणि विरोधकांनी आपापल्या परीने राजकीय सारीपाटावरील प्याद्यांची मांडणी केलीय. शिवशंकर ग्रामविकास पॅनेलविरुध्द श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनल अशी थेट लढत होत आहे. या लढतीत वार्ड क्र. ०३ वगळता उर्वरित सर्व वार्डात प्रस्थापितांच्या एकास एक लढ्यात अपक्षांनी संकट उभं केल्याचे चित्र आहे.
गेल्या चार दशकात कासेगांवच्या स्थानिक राजकारणात जाधव विरुद्ध वाडकर, वाडकर विरुद्ध चौगुले, पाटील विरुद्ध चौगुले-वाडकर तर कधी वाडकर विरुद्ध येणगुरे- चौगुले अशीच साचाबद्ध मांडणी होत असे. शैक्षणिक जीवनात एकाच खोलीत 'रूम मेट' म्हणून राहिलेले वाडकर-येणगुरे खेळाच्या मैदानावरील एकाच टीमचे राहिले, पण गावच्या राजकीय आखाड्यात त्यांनी एकमेकाविरुद्ध दंड थोपटले. तेव्हापासून गावच्या राजकारणाची मांडणी बदलत गेली. दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समिती सदस्य तथा गावचे तत्कालीन सरपंच श्रीकांत नागनाथ वाडकर यांचं १९९६ मध्ये अकाली निधन झाले.
सत्तेच्या लढाईत सरदार धारातीर्थी पडल्यावर सैनिकांची जी गत होते, तशीच अवस्था स्वर्गीय श्रीकांत वाडकर समर्थकांची झाली. १९७५ साली प्रदर्शित 'शोले' मधील जेलरच्या ' आधे इधर, आधे उधर' संवादाप्रमाणं झालं. कासेगांव ग्रामपंचायतीवर गेल्या ४ टर्म प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या येणेगुरे गटाचा वरचष्मा आहे. या गावच्या राजकीय घडामोडीवर 'सोल्युशन' काढण्याची क्षमता असणारी मातब्बर ज्येष्ठांची जुनी मुरब्बी फळी काळाच्या पडद्याआड गेल्यावर नव्या पिढीत नवी समीकरणं तयार झाल्याचं दिसतंय.
यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत येणेगुरे-जाधव यांच्या दूरदृष्टीतून यापूर्वीचे माजी उपसरपंच शंकर मच्छिंद्र वाडकर यांना शिवशंकर ग्रामविकास पॅनलनं थेट सरपंच पदाचा उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं आहे. त्यांच्या विरोधात श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलचे यशपाल श्रीकांत वाडकर यांनी स्थानिक राजकीय पटलावर नव्याने एंन्ट्री करुन त्यांच्यासमोर एक कडवे आव्हान उभं केलं आहे.

स्वर्गीय श्रीकांत वाडकर यांच्या निधनानंतर या परिवारातून त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी कोणी पुढे आले नव्हते. २७ वर्षांचा कालावधी मागे गेल्यानंतर यशपाल वाडकर यांनी राजकीय आखाड्यात पदार्पण केलं आहे. शिवशंकर ग्राम विकास पॅनलचे उमेदवार शंकर वाडकर विरुद्ध श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलचे उमेदवार यशपाल वाडकर यांच्यातील 'वाडकर विरुद्ध वाडकर' लढत कासेगांवचा मतदार पहिल्यांदा अनुभवतो आहे.
गावची ग्रामपंचायत आणि बृहत विकास कार्यकारी सेवा सोसायटी ही गावच्या राजकारणाचे बलस्थाने म्हणून पाहिली जातात. सोसायटीच्या राजकारणातील उट्टे ग्रामपंचायतीत तर ग्रामपंचायतच्या राजकारणातील उट्टे सोसायटीत काढण्याची पद्धत गावोगावी असते, त्यास आजमितीला कासेगांव अपवाद आहे, कारण ही दोन्ही बलस्थाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे येणगुरे-जाधव-पाटील गटाच्याच ताब्यात आहेत.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्रेयवाद शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेल्या सर्व कामाचं श्रेय स्वतःकडे घेत माजी सरपंच तथा यंदाचे शिवशंकर ग्रामविकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार शंकर वाडकर मतदारांपर्यंत गेले तर त्यांचे विरोधक यशपाल वाडकर यांनी आजमितीपर्यंत राबविलेले समाजोपयोगी उपक्रमांवर जोर दिला असून लोकरत्न स्व. श्रीकांत वाडकर यांच्याप्रमाणे २० कलमी कृति कार्यक्रम मतदारांसमोर ठेवला आहे.
या अटीतटीच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक ०१ मध्ये श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीत संभाजी लक्ष्मण चौगुले (सर्वसाधारण पुरुष), संगीता मच्छिंद्र गायकवाड(सर्वसाधारण स्त्री) आणि ज्ञानेश्वर रामचंद्र रोकडे (ना.म. प्र. पुरुष) असून त्यांच्या विरुध्द शिवशंकर ग्रामविकास पॅनेलचे वार्ड क्रमांक एक चे अधिकृत उमेदवार म्हणून भोजने संतोष गंगाराम, भोसले चंद्रकला श्रीशैल आणि चव्हाण चंद्रकांत रामदास रणमैदानात आहेत.

शिवशंकर ग्रामविकास पॅनलचे वार्ड क्रमांक ०२ चे अधिकृत उमेदवार म्हणून वानकर पांडुरंग विवेकानंद, काळे रोहिणी उमेश आणि वाडकर निर्मला नितीन निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विरोधात श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलचे या वार्डातील अधिकृत उमेदवार अनिता सुरेश हेडे (सर्वसाधारण स्त्री), सोनाली सत्यपाल वाडकर (सर्वसाधारण स्त्री) आणि भरत रामचंद्र जाधव (सर्वसाधारण पुरुष) रिंगणात आहेत.

वार्ड क्रमांक ०३ मध्ये श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलचे मोहन संभाजी जाधव आणि पद्मजा निशिकांत पाटील यांच्याविरुध्द शिवशंकर ग्रामविकास पॅनलचे अधिकृत उमेदवार जाधव नारायण दिगंबर आणि चौगुले सुरेखा रामहरी निवडणूक रिंगणात आहेत. वार्ड क्रमांक ०४ मध्ये  शिवशंभर ग्रामविकास पॅनलचे अधिकृत उमेदवार कोमल ज्योतिबा राऊत, जयश्री अमोल सोनटक्के आणि योगीराज काशिनाथ भोज असून त्यांच्या विरुध्द श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार सोनाली केतन पाटोळे (ना.मा.प्र.), कल्पना श्रीकांत राऊत (अनुसूचित जाती स्त्री) आणि शेख शहाजान म. हनिफ (सर्वसाधारण पुरुष) निवडणूक लढवित आहेत. या प्रभागात राऊत परिवारातून दोघी जावा वेगवेगळ्या पॅनेलमधून आपलं नशिब आजमावत आहेत.
निवडणूक अन् कार्यकर्ते सांभाळायचे तर ' ओले -सुके '
करावंच लागले, प्रलोभने दिली गेली असणारचं ... 'झाकली 'मूठ' सव्वा लाखाची' अशी ग्रामीण आहे, त्यास ही निवडणूक ही अपवाद नसल्याचेही दिसलंय. या निवडणुकीत वार्ड क्र. ०१ मध्ये जगदेवी हणमंत गायकवाड, चौगुले प्रविण शिवराम आणि जाधव महादेवी महावीर अपक्ष उमेदवार आहेत. वार्ड क्र. ०२ मध्ये दत्तात्रय सुखदेव वाडकर आणि वार्ड क्र. ०४ मध्ये प्रकाश सुदर्शन पांगरकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असून यांच्या उमेदवारीनं दोन्ही पॅनलची डोकेदुखी तर ठरणार नाहीत, ना असंही म्हटलं जात आहे. आता उरलंय  केवळ जनसंपर्क ... हितगुज ... शनिवारचं जागरण... रविवारची मतप्रक्रिया अन् सोमवारी निकाल ... या घटनाक्रमात कोणत्या नेतृत्वाचा कस लागणार अन् कोणाचा निकाल हे उद्याच्या गर्भात आहे, हे मात्र नक्की !
To Top