सोलापूर : बायोक्लीन जैविक कचरा प्रकल्प या ठेकेदाराने कोविड-१९ च्या काळामध्ये डीपी किट आणि औषधे यावर प्रकिया करून नष्ट न करता ते जमिनीत पुरल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आलाय. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी मोरे सदर प्रकरणाकडे लक्ष देत नसल्याचा निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भोगाव येथील महानगरपालिकेच्या पाणी टाकीवर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन सुरू केलंय.
कोविड-१९ च्या काळामध्ये डीपी किट आणि औषधे यावर प्रकिया करून नष्ट करणे अनिवार्य होते, मात्र बायोक्लीन जैविक कचरा प्रकल्प या ठेकेदाराने त्यास बगल देत त्यावर प्रक्रिया करणे टाळत, शॉर्टकट म्हणून ते जमिनीत पुरले असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाल्यापासून प्रहार जनशक्ती पक्षानं त्याचा पाठपुरावा व्हावा, यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्याकडे गेल्या ०३ दिवसांपासून पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई झाली नाही.
मनपा अधिकारी त्या ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचा रोष तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी मोरे यांनी या प्रकरणाकडे केलेले दुर्लक्ष याचा निषेध नोंदवून लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेची भोगांव येथील पाणी टाकी गाठली. या गैरप्रकाराकडे लक्ष देण्याऐवजी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत गुरुवारी सकाळपासून ' शोले ' स्टाईल आंदोलन सुरू केले. गेले ०९ तास उलटले तरी ते आंदोलन सुरू होते, असं सांगण्यात आलंय.