Type Here to Get Search Results !

संतापजनक ... ! पोलिसांत गेला तर जीव घेऊ; अल्पवयीन पीडित बालिकेच्या बापाला धमकी

 

सोलापूर : मुलाने बालिकेशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार त्याच्या कुटुंबियाच्या कानी घालण्यासाठी गेलेल्या मुलीच्या बापाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. हा संतापजनक प्रकार रामवाडीतील न्यू धोंडिबा वस्तीत, शनिवारी रात्री घडलाय. या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, न्यू धोंडिबा वस्तीतील १० वर्षीय बालिका मदरस्याकडे पाय चालली होती. त्याच गल्लीतील लकी उर्फ लक्या अजय गायकवाड याने तिचा हात धरुन तिला गल्लीतील बोळात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले.

अल्पवयीन मुलीनं, तो प्रकार घरी आई वडिलास सांगितला. त्यावेळी, त्या मुलीचे वडील लकी उर्फ लक्याच्या घरापर्यंत गेले. तेथे गायकवाड परिवारातील विजय गायकवाड आणि बजरंग गायकवाड यांनी, त्या मुलीच्या वडिलास शिवीगाळी करून पोलीसात गेला, तर जीवे मारू अशी धमकी दिली.

त्यानंतर धास्तावलेल्या त्या कुटुंबानं सलगर वस्ती पोलिसांकडं धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी लकी उर्फ लक्या अजय गायकवाड, विजय अशोक गायकवाड आणि बजरंग अशोक गायकवाड (तिघे रा. न्यू धोडिंबा वस्ती, रामवाडी) या तिघांविरुद्ध अल्पवयीन बालिकेचा विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.