कोजागीरी पौर्णिमेनिमित्त जिल्‍ह्यातील वाहतुक मार्गात बदल

shivrajya patra
सोलापूर : कोजागीरी पौर्णिमानिमित्त तूळजापूरला जोडणाऱ्या विविध मार्गावरून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर कडे पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक २६ ऑक्टोबर रात्री १२.०० वाजलेपासून दि. २९ ऑक्टोबर रात्री १२.०० वाजेपर्यंत तुळजापुर ते सोलापूर व तुळजापूर ते बार्शी येथील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक १५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. कोजागीरी पौर्णिमा व मंदिर पोर्णिमानिमित्त सोलापूर शहर, सोलापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातून  मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरकडे पायी चालत जातात. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली आहेत.

या कालावधीत तुळजापुर ते सोलापूर व तुळजापूर ते बार्शी या मार्गावर पोलीस, रूग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व एस. टी. बसेस वगळून सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच दिनांक २६ ऑक्टोबर रात्री १२.०० वा. पासून दि. २९ ऑक्टोबर रात्री १२.०० वा. पर्यंत तुळजापूर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार आहे.

पथक्रमण करण्यास मनाई करण्यात आलेले मार्ग :
तुळजापूर ते सोलापूरकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे. सोलापूर ते तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीस सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे. तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच बार्शी ते तुळजापूर कडे जाणाऱ्या वाहतुकीस बार्शी, गौडगाव, ढेकरी, तुळजापूर या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.

वाहने या मार्गावरुन मार्गक्रमण करतील :
तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी वाहतुक मंगरूळपाटी, इटकळ, बोरामणी पुढे सोलापूर या मार्गे पथक्रमण करतील. सोलापूर ते तुळजापूरकडे जाणारी वाहतुक सोलापूरपासून बोरामणी, इटकळ, मंगरूळपाटी पुढे तुळजापूर या मार्गे पथक्रमण करतील. तुळजापूर ते बार्शीकडे येणारी वाहतूक तुळजापूर, धाराशिव, वैराग पुढे बार्शी या मार्गे पथक्रमण करतील. बार्शी ते तुळजापूर कडे जाणारी वाहतुक बार्शी, वैराग, धाराशिव पुढे तुळजापूर या मार्गे पथक्रमण करतील. धाराशिव ते सोलापूर कडे येणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील, सोलापूर ते धाराशिव कडे जाणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील.

पोलीस, रूग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने एस. टी. बसेस या वाहनांना लागू राहणार नाहीत. तथापि तसेच दिनांक २६ ऑक्टोबर रात्री १२.०० वाजलेपासून दि. २९ ऑक्टोबर रात्री १२.०० वाजेपर्यंत तुळजापूर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार आहे.
To Top