सोलापूर : कालपर्यंत श्रीमंती घर/वाड्यावर पाहिली जात होती, आज श्रीमंती बुध्दीमत्तेवर पाहिली जाते. पालकांनी आपल्या पाल्याच्या बुद्धीमत्ता व कौशल्य विकासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, त्यावरच त्यांचं स्वावलंबन अवलंबून आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक एक्कलदेवी यांनी केले.
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित अनुसया रामचंद्र बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयात बुधवारी, ०४ ऑक्टोबर रोजी सकाळी पालक शिक्षक संघ, यांच्या वतीने पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मेळाव्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक एक्कलदेवी बोलत होते.
पालकांनीही आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पाल्यांशी सकारात्मक भावनेने पाहणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या यश-अपयशाला केवळ शिक्षक जबाबदार असतात, असं नाही. आपलं महाविद्यालय प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी व्हावा, याकरिता विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्ता विकासाबरोबर त्यांच्या कौशल्य विकासाकडे लक्ष देते, त्याच्या पाठीवर दफ्तर दिलं की, पालकाची जबाबदारी संपत नाही, आपण पाल्याशी हितगुज केली पाहिजे, असे आवाहनही डॉ. एक्कलदेवी यांनी केले.
काही पालकांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या उपक्रमाचं कौतुक करताना पालक, पाल्य व शिक्षक यांच्यात समन्वय राहावा,अशी भावना व्यक्त केली. बीसीए समन्वयक बेनगिरी, बोलताना म्हणाल्या, बीसीए अभ्यासक्रमास असलेल्या विद्यार्थ्यांवर नव्याने ९ विषयांचा भार आहे, त्यासाठी ते वाचन तर करतातच पण ते लेखन करतात का हेही पालकांनी पाहिले पाहिजे, असेही म्हटले. या मेळाव्यात पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी डॉ. शिरीष भोसले, डॉ. शिवानंद भांजे, डॉ. तुकाराम शिंदे, डॉ. सौ. रजनी दळवी, डॉ. रंजना बनसुडे, सुरेखा बत्तुल, डॉ. पंचप्पा वाघमारे यांच्यासह अन्य प्राध्यापक -प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.