आयुक्तांचा 'तो' आदेश केराच्या टोपलीत ! संभाजी ब्रिगेडने नोंदविला कृतिशील निषेध

shivrajya patra
सोलापूर : गेल्या अनेक महिन्यापासून सोलापूर शहरातील चौका-चौकात अनधिकृत डिजिटल चे पेव फुटले आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी चार वेळा आदेश काढूनसुद्धा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली त्या आदेशाला केराच्या टोपलीत टाकून संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय. अनधिकृत डिजिटल लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांची मागणी आहे.

सोलापूर शहरात पुन्हा अनधिकृत डिजिटल फलकांचे पेव फुटले असून, ते शहरात जागोजागी लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहराचं विद्रूपीकरण होत आहे. शहरातील दुकानासमोर मोठमोठे बेकायदेशीर डिजिटल फलक लावण्यात आल्याने दुकानदारांचे नुकसान होत आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी वेळोवेळी आदेश काढले. बेकायदेशीर डिजिटल लावणाऱ्यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनसुद्धा महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.

आतापर्यंत कोणत्याच अनाधिकृत डिजिटल फलक लावणार्‍यावर महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचे वतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून डिजिटल फलक लावण्यात येत आहे, यास महानगरपालिका व पोलीस प्रशासन जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कोणतेही डिजिटल फलक लावण्यास असलेली बंदी लक्षात घेऊन यापूर्वीच्या पोलिस आयुक्तांच्या कार्यकाळात अनधिकृत डिजिटल फलक लावल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होत होते, याचंही स्मरण श्याम कदम यांनी यावेळी केले आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, उप शहर प्रमुख सिताराम बाबर, शहर कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शहर सचिव रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, शहर सचिव नागनाथ कोरे आदी उपस्थित होते.
To Top